

नवी दिल्ली : प्रेम आंधळे असते असे नेहमी म्हटले जाते. पण यात बदल करायला हवा. एका अंध व्यक्तीने प्रेम किती डोळस व सच्चे असू शकते हे दाखवून दिले आहे. १००% दृष्टिहीन असलेल्या राम कृपाल याने आपल्या जोडीदाराच्या सुटकेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची जोडीदारदेखील पूर्णपणे अंध आहे. पण ती मुस्लिम आहे. यामुळे या संबंधांना तिच्या घरच्यांचा विरोध असून तिच्या कुटुंबीयांनी तिला जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप रामकृपालने केला आहे.
न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती रविंदर दुडेजा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी नोटीस बजावली असून, यात महिलेच्या पालकांचाही समावेश आहे. न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, १८ एप्रिल २०२६ (शनिवार) रोजी त्या महिलेला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करावे.
राम कृपाल याने वकील अनुभव त्यागी आणि पार्थ शर्मा यांच्यामार्फत राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत ही 'हेबियस कॉर्पस' (बंदीप्रत्यक्षीकरण) याचिका दाखल केली आहे. संबंधित महिला सज्ञान असून तिला न्यायालयात सादर करून तिची सुटका करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
रामकृपाल आणि ती महिला दोघेही १००% दृष्टिहीन असून त्यांच्यात संमतीने प्रेमसंबंध होते. ती महिला दिल्लीतील राणी खेडा येथील एका हॉस्टेलमध्ये स्वतंत्रपणे राहत होती. मात्र, १६-१७ मार्च २०२६ च्या मध्यरात्री, त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिला तिथून नेल्याचा आरोप आहे. त्या दिवसापासून गेले महिनाभर तिला बाह्यजगाशी संपर्क करू दिला जात नाहीये आणि तिचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तिने तिला तिच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवले असल्याचे आणि तिला याचिकाकर्त्यासोबत राहायचे व लग्न करायचे असल्याचे सांगितले होते.
धार्मिक अडथळे आणि धमक्या
रामकृपाल हा हिंदू आणि त्याची मैत्रीण मुस्लिम असल्याने या नात्याला कुटुंबाचा विरोध धार्मिक कारणांमुळे असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या महिलेच्या कुटुंबीयांकडून आपल्याला धमक्या मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने असेही नमूद केले की, १२ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांत तक्रार देऊनही कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्यामुळे अखेर त्याला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.