महिलेने मध्यरात्री ऑर्डर केलं उंदीर मारण्याचं औषध; Delivery Boy ला आला आत्महत्येचा संशय, मग जे घडलं...

ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी फोन केला असता समोरून महिलेचा रडण्याचा आवाज येत होता. त्याच क्षणी काहीतरी गंभीर असल्याची जाणीव त्याला झाली.
महिलेने मध्यरात्री ऑर्डर केलं उंदीर मारण्याचं औषध; Delivery Boy ला आला आत्महत्येचा संशय, मग जे घडलं...
Published on

चेन्नई : मध्यरात्री उंदीर मारण्याचे औषध देण्यास नकार देत ब्लिंकिटच्या डिलिव्हरी एजंटने एका महिलेचा जीव वाचवल्याची हृदयस्पर्शी घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. महिला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचं लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत तिला रॅट पॉइजन देण्यास स्पष्ट नकार दिला आणि ऑर्डर रद्द करण्यास भाग पाडले. डिलिव्हरी बॉयने या घटनेची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फोनवरच आला संशय

व्हायरल व्हिडिओमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटने सांगितले की, ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी फोन केला असता समोरून महिलेचा रडण्याचा आवाज येत होता. त्याच क्षणी काहीतरी गंभीर असल्याची जाणीव त्याला झाली. तिच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याआधीच तो चिंताग्रस्त झाला होता.

उंदीर मारण्याचे औषध देण्यास नकार

डिलिव्हरीसाठी पोहोचल्यानंतर संबंधित महिला अत्यंत अस्वस्थ असल्याचे त्याच्या लक्षात आले. तिने मागवलेली उंदीर मारण्याची तीन पाकिटे देण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. “कोणतीही अडचण असली तरी आत्महत्या करू नका,” असे सांगत त्याने महिलेला समजावले. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “मी तिला थेट विचारले, ‘हे औषध आत्महत्या करण्यासाठी मागवले आहे का?’ तिने नकार दिला. पण, जर ते खरोखर उंदरांसाठी असते, तर दिवसा किंवा दुसऱ्या दिवशीही मागवता आले असते. मग मध्यरात्रीच का ऑर्डर दिली?”

ऑर्डर रद्द करण्यास महिलेला प्रवृत्त

एजंटने महिलेला समजावून अखेर ऑर्डर रद्द करायला लावली. “आज मला वाटतंय की आयुष्यात काहीतरी खूप मोठं आणि चांगलं केलं,” असे भावूक शब्द त्याने व्हिडिओमध्ये सांगितले.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून डिलिव्हरी बॉयच्या माणुसकीचे कौतुक केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in