
''प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरून आमची बस जात होती. अचानक समोरून वेगात येणाऱ्या बोलेरोने धडक दिली. अपघातावेळी बसमधील अनेक प्रवासी झोपले होते. मी बसच्या केबिनमध्येच बसलो होतो. मी जागा होतो. सुदैवाने या दुर्घटनेत मी कसाबसा वाचलो,'' असे जखमी प्रवासी रोडमल याने सांगितले.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर शुक्रवारी (दि १४) रात्री बोलेरो आणि बसचा भीषण अपघात घडला. बोलेरोतील प्रवासी महाकुंभमेळ्याला जात होते. तर बस महाकुंभमेळ्यात संगम स्नानानंतर भाविकांना घेऊन वाराणसीला जात होती. बसमधील सर्व प्रवासी मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील आहेत. या अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की बोलेरोचा चक्काचूर होऊन बोलेरो चालकासह सर्व १० जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत बसमधील १९ जण जखमी झाले. सर्व जखमींना रामनगर येथील सीएचसी येथे दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी स्वरूप राणी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती अशी की, ''धडकेचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून आम्ही तिथे धाव घेतली. यावेळी बोलेरोचा चक्काचूर झाला होता. गाडीत मृतदेह अडकले होते. आम्ही पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस गॅस कटर आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढण्यसाठी बोलेरोला गॅस कटरने कापावे लागले. गाडीतील सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. सर्व मृतदेह खूप विद्रुप झाले होते. चेहऱ्यावरून मयतांची ओळख पटणे अवघड होते. कोणाचा हात तुटलेला, तर कोणाच्या डोक्याला दुखापत झाली होती,''असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघातातील सर्व मयत छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील रहिवासी असून सर्व भाविक महाकुंभमेळ्याला जात होते. मयतांच्या खिशातील आधारकार्ड आणि मोबाईल नंबरद्वारे त्यांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवले आहे. त्यांचे कुटुंबीय छत्तीसगड येथून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
दरम्यान, या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवेदना व्यक्त करत जलदगतीने मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.