गुजरातमध्ये २५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
(संग्रहित फोटो)

गुजरातमध्ये २५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा येथील २५ हून अधिक शाळांना सोमवारी बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे ईमेल मिळाल्याने खळबळ माजली आहे.
Published on

अहमदाबाद/वडोदरा : गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा येथील २५ हून अधिक शाळांना सोमवारी बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे ईमेल मिळाल्याने खळबळ माजली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, सर्व शाळांचा परिसर रिकामा करण्यात आला आणि तपासणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाबाबत गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, अशा बॉम्बस्फोटाच्या धमक्यांची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. राज्याच्या डीजीपींना तत्काळ सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणावर उच्च स्तरावर लक्ष ठेवले जात आहे.

अहमदाबादमधील १५ हून अधिक आणि वडोदरामधील ११ हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणारे ईमेल आले आहेत. संघवी यांनी सांगितले की, अहमदाबाद आणि वडोदरा येथे मिळालेल्या बॉम्ब धमक्यांची तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांनी तपास जलद करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. शाळांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

विद्यार्थी आणि पालकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे, कोणत्याही संशयास्पद घटकांना सोडले जाणार नाही आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यभरातील सुरक्षा संस्था सतर्क आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शाळांच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे आणि धमकी देणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे.

सरकार गंभीर - रिवाबा जडेजा

अहमदाबाद आणि वडोदरा येथील शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्यांबाबत गुजरातच्या शिक्षणमंत्री रिवाबा जडेजा म्हणाल्या, सरकार बॉम्बच्या धमक्यांबाबत गंभीर आहे. शाळा आणि इतर ठिकाणांना येणाऱ्या सर्व धमक्यांबाबत गांभीर्याने विचार केला जात आहे. राज्य सरकार बॉम्बच्या धमक्यांची चौकशी करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in