शीना बोराच्या हाडांचे अवशेष अखेर सापडले

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात १२ वर्षांपूर्वी पेण पोलिसांना जंगलात आढळलेले आणि त्यानंतर गायब झालेले मानवी हाडांचे अवशेष अखेर सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात सापडले.
शीना बोराच्या हाडांचे अवशेष अखेर सापडले
Published on

मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणात १२ वर्षांपूर्वी पेण पोलिसांना जंगलात आढळलेले आणि त्यानंतर गायब झालेले मानवी हाडांचे अवशेष अखेर सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात सापडले. तपास यंत्रणेने मुंबई सत्र न्यायालयात ही माहिती दिली. या हत्याकांडाच्या खटल्यात महत्त्वाचा पुरावा असलेले मानवी हाडांचे अवशेष गायब झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. २०१२ मध्ये शीनाचा मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणी पेण पोलिसांना अवशेष सापडले होते. त्या अवशेषांची पहिली चाचणी जे. जे. रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांनी केली होती. ते अवशेष मानवी हाडांचे असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. या खटल्यात ९१वे साक्षीदार म्हणून सीबीआयमार्फत त्यांची साक्ष तपासली जात आहे.

मागील सुनावणीवेळी सीबीआय वकील अ‍ॅड. सी. जे. नांदोडे यांनी पेण पोलिसांना १२ वर्षांपूर्वी सापडलेल्या अवशेषांची ओळख पटवण्याच्या हेतूने ते अवशेष खान यांना दाखवण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. मात्र ते अवशेष सापडत नसल्याचे अ‍ॅड. नांदोडे यांनी सांगितले होते. बुधवारी सुनावणीच्या वेळी डॉ. झेबा खान उलट तपासणीसाठी कटघरात उभ्या राहिल्या. यावेळी उलटतपासणी सुरू होण्याआधी विशेष सीबीआय न्यायाधीश एस. पी. निंबाळकर यांनी डॉ. खान यांचा भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून ईमेल प्राप्त झाले आहे. डॉ. खान यांनी विदेशात संपत्ती खरेदी केली आहे. तसेच मानवी हाडांच्या अवशेषाचा पुरावा गायब होण्यामागे डॉ. खान व आरोपींची मिलीभगत असू शकते, असा आरोप त्या व्यक्तीने केल्याचे स्पष्ट केले. तसेच हा आरोप गंभीर असल्याने त्याची चौकशी झाली पाहिजे, असे मत न्यायाधीशांनी नोंदवले.

logo
marathi.freepressjournal.in