बुकी अनिल जयसिंघानीला मोक्का लागणार

जयसिंघानी याच्यावर मुंबई, ठाणे, अहमदाबाद, आसाम, राजस्थान, गोवा व मध्य प्रदेशात १७ फौजदारी गुन्हे दाखल
बुकी अनिल जयसिंघानीला मोक्का लागणार

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी क्रिकेट बुकी व हवाला ऑपरेटर अनिल जयसिंघानी याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची तयारी मुंबई पोलीस करत आहेत. तसेच दहशतवादाला पैसा पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

जयसिंघानी याच्यावर मुंबई, ठाणे, अहमदाबाद, आसाम, राजस्थान, गोवा व मध्य प्रदेशात १७ फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याने १० हजार कोटींचे हवालाचे व्यवहार केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील ईडी कार्यालयाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कायदा तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्काप्रकरणी एखाद्या आरोपीविरुद्ध नोंदवलेल्या इतर गुन्हेगारी गुन्ह्यांपेक्षा तो अधिक गंभीर समजला जातो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानीला जामीन न घेता अधिक काळ कोठडीत ठेवण्यास आणि त्याच्या अटकेसाठी अन्य राज्यात स्थानांतरित करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोक्कामुळे राज्य सरकारला विशेष अधिकार मिळाले आहेत. त्यात विनाजामीन दीर्घकाळ आरोपीला कोठडीत ठेवता येते. आयपीएल क्रिकेटमध्ये बेटिंग, दुबई व कराचीशी हवाला व्यवहारांचा त्याचा संबंध आहे. खंडणी व ब्लॅकमेल करण्याच्या गुन्ह्यात त्याला मोक्का लावता येऊ शकतो, असे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

गोव्यातील अंजुना पोलिसांत जयसिंघानी याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तसेच ‘ईडी’च्या अहमदाबाद येथील पथकालाही त्याचा ताबा मिळालेला नाही. २०१५ पासून तो मनीलाँड्रिंग प्रकरणात ‘ईडी’ला हवा होता. सध्या तो तळोजा न्यायालयात न्यायालयीन कोठडीत आहे. विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात असलेले गुन्हे पाहता पोलीस पथके त्याला अटक करण्यासाठी वाट पाहत आहेत.

अनिल जयसिंघानी याचे खटले मृगेंद्र सिंग व मनन संघाई हे लढत आहेत. त्यांनी सांगितले की, तो १७ प्रकरणांमध्ये ‘हवा असलेला गुन्हेगार’ असल्याचे नाकारले. १७ पैकी बहुतेक खटले बंद झाले असून, न्यायालयात ५ खटले प्रलंबित आहेत. त्याला अवैध अटक केली आहे. त्याला कोठडीत ठेवण्यासाठी नवीन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास जनतेसमोर कधी ना कधी सत्य समोर येईल, असे त्याच्या दोन्ही वकिलांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in