"खूप मुले जन्माला घाला, मोदीजी घर देतील" ; दोन बायका, आठ अपत्य असलेल्या मंत्र्याचे विधान चर्चेत

राजस्थानातील उदयपूरच्या नाई गावात 'विकसित भारत संकल्प यात्रा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजस्थानाचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची देखील उपस्थिती होती. यावेळी खराडी यांनी उपस्थितांना केलेल्या आवाहनाने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
"खूप मुले जन्माला घाला, मोदीजी घर देतील" ; दोन बायका, आठ अपत्य असलेल्या मंत्र्याचे विधान चर्चेत

राजकारणी बोलण्याच्या ओघात अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. ही वक्तव्ये सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. राजस्थानचे कॅबिनेट मंत्री बाबूलाल खराडी यांनी केलेले वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

राजस्थानातील उदयपूरच्या नाई गावात 'विकसित भारत संकल्प यात्रा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजस्थानाचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची देखील उपस्थिती होती. यावेळी खराडी यांनी उपस्थितांना केलेल्या आवाहनाने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

"कोणीही उपाशी झोपणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. कोणीही बेघर राहणार नाही, खूप मुले जन्माला घाला पंतप्रधान मोदीजी तुम्हाला घर बांधून देतील, मग चिंता कसली", असे खराडी यांनी म्हटले. यावेळी उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

बाबूलाल खराडी यांना दोन बायका आणि आठ अपत्य-

नागरिकांना खूप मुले जन्माला घालण्याचा सल्ला देणाऱ्या बाबूलाल खराडी यांना दोन बायका आहेत. त्यांनी आदिवासी पंरपरेनुसार दोन लग्ने केली आहेत. तसेच, त्यांना आठ अपत्ये देखील आहेत. यात चार मुली आणि चार मुलांचा समावेश आहे.

पहिल्यांदाच झाले मंत्री-

बाबूलाल खराडी हे राजस्थानच्या झाडोल विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार आणि आता पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री भजनलाल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांवर बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले. यावेळी खराडी यांनी गहलोत सरकारच्या योजनांवर देखील हल्लाबोल केला.

logo
marathi.freepressjournal.in