‘शक्ती’ शब्दावरून रणकंदन; राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांचे उत्तर

मोदी हे केवळ एक मुखवटा आहेत. त्यांच्यामागील शक्ती वेगळी आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.
‘शक्ती’ शब्दावरून रणकंदन; राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांचे उत्तर

जगतियाल : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्ती या शब्दावरून केलेल्या परस्परविरोधी विधानांमुळे राजकीय आघाडीवर रणकंदन माजले आहे. राहुल यांनी रविवारी मुंबई येथील जाहीर सभेत मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याला सोमवारी मोदी यांनी तेलंगणामधील जगतियाल येथे घेतलेल्या सभेत उत्तर दिले आहे.

मोदी हे केवळ एक मुखवटा आहेत. त्यांच्यामागील शक्ती वेगळी आहे, असे विधान राहुल यांनी केले होते. त्याला उत्तर देताना मोदी यांनी म्हटले आहे की, मी देशातील प्रत्येक माता, भगिनी आणि मुलीत शक्तीचे स्वरूप पाहतो. आम्ही त्यांची पूजा करतो. मी भारतमातेचा पुजारी आहे. मात्र, काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यात शक्तीला संपवण्याचा उल्लेख केला आहे. ही निवडणूक म्हणजे शक्तीची पूजा करणारे आणि शक्तीला नष्ट करू पाहणारे यांच्यातील लढाई आहे. मोदी यांनी सोमवारी केलेल्या आरोपावर राहुल यांनी खुलासा केला आहे. मोदी यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

मोदी यांना माझे शब्द आवडत नाहीत. ते दर वेळी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून अर्थ बदलून टाकतात. मोदी यांच्याविरुद्धची लढाई वैयक्तिक नसून ती एका शक्तीविरुद्धची लढाई आहे. कारण मोदी त्या शक्तीचा केवळ एक मुखवटा आहेत, असे मी म्हणालो होतो. मी शक्ती हा शब्द धार्मिक अर्थाने वापरला नव्हता. देशातील संस्थावर सध्या भ्रष्टाचार आणि असत्य या वाईट शक्तींचा प्रभाव आहे. त्या अर्थाने मी शक्ती हा शब्द वापरला होता. केंद्रीय अन्वेषण संस्था (सीबीआय), आयकर खाते, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), निवडणूक आयोग, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, सरकारी प्रशासन अशा सगळ्या यंत्रणांवर सध्या या वाईट शक्तीचा प्रभाव आहे. तिच्या ताब्यातून देश सोडवणे गरजेचे आहे, राहुल यांनी सोमवारी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) प्रसारीत केलेल्या संदेशात म्हटले.

असुरी आणि दैवी शक्तीची लढाई

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनीही मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राहुल गांधी यांच्या शक्ती शब्दाविषयी वक्तव्यावरून भाजपने टीका चालवली आहे. पण २०१४ साली भाजपची सत्ता आली तेव्हापासूनच देश असुरी शक्तीच्या ताब्यात गेला. ही निवडणूक असुरी शक्ती आणि दैवी शक्ती यांच्यातील लढाई आहे. यापुढे देशावर असुरी शक्तीचा प्रभाव चालणार नाही. दहा वर्षांपूर्वी भाजप कथुआ, उन्नाव आणि हाथरसच्या बलात्काऱ्यांच्या बाजूने मोर्चे काढत होती तेव्हा त्यांना नारीशक्तीची आठवण झाली नाही का? जेव्हा मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून त्यांची जाहीरपणे धिंड काढली जात होती तेव्हा कोणत्या शक्तीने त्यांना मौन बाळगायला लावले होते?, असा सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in