
प्रयागराज : संकट काळात देशाला एकसंध ठेवण्याचे काम राज्यघटनेने केले आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केले. अलाहाबाद उच्च न्यायालयात वकीलांच्या चेंबर व मल्टी लेव्हल पार्किंगचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, जेव्हा राज्यघटना तयार होत होती आणि त्याचा अंतिम मसुदा राज्यघटना समितीसमोर सादर केला जात होता, तेव्हा काही लोक म्हणायचे की, राज्यघटना ही खूप संघराज्यीय आहे तर काही जण म्हणायचे की ते खूप एकात्मक आहे.
तेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिले होते की, राज्यटना पूर्णपणे संघराज्यीय नाही किंवा पूर्णपणे एकात्मक नाही. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की, आम्ही एक अशी राज्यघटना दिली आहे जी शांतता आणि युद्धाच्या काळात भारताला एकसंध आणि मजबूत ठेवेल," असे सरन्यायाधीश म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेमुळे भारत हा विकासाच्या वाटेवर निघाला. सध्या तुम्ही बाजूच्या देशांची अवस्था बघू शकता. स्वातंत्र्यानंतर भारताने मोठा विकास केला. जेव्हा देश संकटात होता तेव्हा तो मजबूत व एकसंध राहिला. याचे संपूर्ण श्रेय राज्यघटनेला आहे, असे ते म्हणाले. राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासात विधीमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायपालिकेने देशात सामाजिक व आर्थिक समानता आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. न्याय मागणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचणे हे आमचे मूलभूत कर्तव्य आहे.