"मला याच्याशी काही देणं घेणं नाही", साक्षी मलिकच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेवर ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया

ब्रिजभूषण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या तब्बल ११ महिन्यांनी झालेल्या WFI च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांच्या कुटुंबातील कोणलाही सहभागी न होण्यास सांगितले होते. मात्र, कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह हे ब्रिजभूषण यांच्या मर्जीतले असल्याने साक्षी मलिकने कुस्ती सोडल्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
"मला याच्याशी काही देणं घेणं नाही", साक्षी मलिकच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेवर ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया

भारतीय कुस्ती महासंघाच्या(WFI) निवडणुकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे विजयी झाल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत कुस्तीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यावेळी तिला रडू कोसळले आणि ती पत्रकार परिषदेतून निघून गेली. यावर ब्रिजभूषण शरण सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. साक्षीने घेतलेल्या कुस्ती सोडण्याच्या निर्णयावर माध्यम प्रतिनिधींनी ब्रिजभूषण यांना विचारणा केली असता त्यांनी, "मला याच्याशी काही देणं घेणं नाही" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली साक्षी मलिक?

साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत कुस्तीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यावेळी तिला रडू कोसळले. आम्ही महिला अध्यक्षाची मागणी केली होती. महिला अध्यक्ष असल्यास छळ होणार नाही. मात्र, कुस्ती महासंघात या आधीही महिलांचा सहभाग नव्हता आणि आजची यादी बघितली तर एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. आम्ही पूर्ण ताकदीने लढलो, हा लढा अजूनही सुरुच राहणार आहे.नव्या पिढीच्या पैलवानांना लढायचे आहे, असे म्हणत साक्षीने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो होतो. देशातील कानाकोपऱ्यातील लोक आम्हाला पाठिंबा द्यायला येत होते. जर ब्रिजभूषण सिंह यांचे बिझनेस पार्टनर आणि जवळचे सहकारीच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होत असतील तर मी कुस्ती सोडते, असे म्हणत साक्षीला रडू कोसळले आणि ती पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेली.

विनेश फोगाटलाही अश्रू अनावर

या पत्रकार या परिषदेला ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट हे देखील उपस्थित होते. विनेश फोगाट म्हणाली, "आमच्या किमान अपेक्षा आहेत, आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. कुस्तीचे भविष्य अंधारात आहे हे खेदजनक आहे. आपले दु:ख कोणाला सांगायचे? आम्ही अजूनही लढतोय." असे म्हणताना विनेशलाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.

काय आहे प्रकरण?

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटू यांनी आंदोलन छेडले होते. यानंतर ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर ११ महिन्यांनी झालेल्या WFI च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांच्या कुटुंबातील कोणलाही सहभागी न होण्यास सांगितले होते. मात्र, कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह हे ब्रिजभूषण यांच्या मर्जीतले असल्याने साक्षी मलिकने कुस्ती सोडल्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

दरम्यान, कुस्तीपटूंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत साक्षी मलिकने कुस्ती सोडल्याचा निर्णय घेतल्याने माध्यम प्रतिनिधींनी ब्रिजभूषण यांना याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी आपल्याला याच्याशी काही देणं घेणं नसल्याचे सांगत काढता पाय घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in