

नवी दिल्ली : सबळ पुराव्यांचा अभाव असल्याचे नमूद करत दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांची सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.
तक्रारदारांमध्ये जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिचाही समावेश होता. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवार यांनी सुनावला. सिंह हे भाजपचे माजी खासदार आहेत, तर तोमर हे महासंघाचे माजी सहाय्यक सचिव आहेत. बृजभूषण सिंह यांचे वकील राजीव मोहन यांनी माहिती दिली की, साक्षीदारांच्या जबानीतील तफावत आणि परस्परविरोधी विधाने लक्षात घेऊन न्यायालयाने सिंह आणि तोमर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
गंभीर प्रकरणाची पार्श्वभूमी
महिला कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर ३६ दिवस ठिय्या आंदोलन केले. महासंघाचे तत्कालिन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे या आंदोलनाचा मुख्य चेहरा होते. सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले. दिल्ली पोलिसांनी सिंह आणि तोमर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. (एका अल्पवयीन कुस्तीपटूने दाखल केलेला गुन्हा तपासाअंती रद्द करण्यात आला होता). दिल्ली न्यायालयाने सिंह यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि धमकावल्याचे आरोप निश्चित केले, तर एका महिला कुस्तीपटूच्या तक्रारीत पुरेसे पुरावे नसल्याने ती तक्रार फेटाळली. इन-कॅमेरा चाललेल्या या खटल्याचा अंतिम युक्तिवाद २ जुलै २०२६ रोजी पूर्ण झाला होता.
माझ्यासाठी आनंदाची बातमी
न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त करताना बृजभूषण सिंह म्हणाले, माझ्यावरील आरोप सत्य ठरले तर मी स्वतःला फाशी लावून घेईन, असे मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. माझी निर्दोष मुक्तता झाली याचा मला अत्यंत आनंद आहे. माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. न्यायालयाचा सविस्तर आदेश वाचल्यानंतरच मी यावर अधिक बोलेन.
निकालास आव्हान देणार : विनेश फोगट
न्यायालयाच्या निर्णयानंतर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी सोशल मीडियावर संयुक्त निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, सुरुवातीपासूनच संपूर्ण प्रशासन, सरकार आणि यंत्रणा बृजभूषण यांना वाचवण्यात गुंतली होती.
न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आम्हाला तीव्र दुःख झाले आहे, परंतु आम्ही हार मानलेली नाही आणि न्यायालयीन लढा सुरूच ठेवू. तसेच विनेशने आरोप केला की, सिंह यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून अनेक मुलींना नावे मागे घेण्यासाठी धमकावले होते, तरीही अनेक महिला कुस्तीपटू न्यायासाठी ठाम राहिल्या.
सरकारी वकील मनीष रावत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या सविस्तर आदेशाचा अभ्यास केल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याबाबत योग्य ती पावले उचलली जातील. या निर्णयामुळे महिला कुस्तीपटूंना मोठा धक्का बसला असून, त्या या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत, अशी माहिती जागतिक अजिंक्यपद पदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगट हिने सोमवारी दिली.