

नवी दिल्ली : '१००% संपूर्ण गव्हाचा ब्रेड' असा दिशाभूल करणारा जाहिरात केल्याप्रकरणी मध्यवर्ती ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर प्रत्यक्ष उत्पादनात गव्हाचे प्रमाण केवळ ६२ टक्के असल्याचे उघडकीस आले आहे.
मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या नेतृत्वाखालील सीसीपीएने २२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात कंपनीला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियासह सर्व माध्यमांमधून ही जाहिरात तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ब्रिटानियाला १५ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जाहिरातीत '१००%' असा दावा केला असताना उत्पादनाच्या पॅकेजिंगवर गव्हाचे प्रमाण ६२ टक्के असल्याचे नमूद केले गेल्याचे लक्षात आल्यानंतर नियामकाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली.
आदेशात म्हटले आहे की, सध्याच्या प्रकरणात उत्पादनात केवळ ६२% संपूर्ण गहू आहे, तर उर्वरित ३८% भागामध्ये तांदळाचा कोंडा आणि इतर घटकांचा समावेश आहे.