
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात 'भारत राष्ट्र समिती' या पक्षाचा विस्तार करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला नांदेडमधून महाराष्ट्रात प्रवेश करत व्हाया हिंगोली, छत्रपती संभाजीनगर मार्गे आता आपला मोर्चा नागपूरकडे वळवला आहे. महाराष्ट्रात तेलंगणापेक्षा जास्त नैसर्गिक साधन संपदा आहे. तरी देखील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात होतात, असं म्हणत ही परिस्थिती बदलण्यासाठी आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्वच निवडणूका लढवणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितंल आहे. महाराष्ट्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर तेलंगणामधील कृषी प्रारुप लागू करु, त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू आणि नंतर मध्य प्रदेशात पक्षाचा विस्तार करु अशी घोषणा त्यांनी गुरुवार (१५ जून) रोजी नागपूर येथे केली आहे.
के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या 'भारत राष्ट्र समिती' या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी नागपूर येथील रेशीम बागेतील कविवर्य सुरेश भट सभागृत कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभागृह ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी भरले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी वर्धा मार्ग येथील पक्ष कार्यालयाचे उद्धघाटन केलं.
आपल्या देशात सुपीक भू-प्रदेश, मुबलक पाणी, कोळसा आणि सर्वाधिक जनसंख्या आहे. देश स्वातंत्र्य व्हायला ७५ वर्ष झाली तरी देखील पाण्याची टंचाई आहे, तर शहरात शुद्ध पाणी मिळत नाही. तसंच सिंचनासाठी देखील पाणी उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारत राष्ट्र समिती संपूर्ण देशात परिवर्तन करण्याचं ध्येय घेऊ निघाली असल्याचं ते म्हणाले. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असून येथे सर्व स्तरावरील निवडणुका लढवण्यात येतील. यानंतर मध्य प्रदेशात प्रवेश केला जाईल. असं राव म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी भारतातील जनता पक्षावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, जाती धर्माच्या नावाने समाजात फूट पाडून निवडणुका जिंकल्या जात आहे. पण हा विजय फक्त त्या नेत्याचा त्या पक्षाचा आहे. त्या लोकांना याचा काहीच लाभ मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.