BSF मध्ये ५० टक्के पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव

गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठीचे आरक्षण १० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. यासंदर्भात १८ डिसेंबर रोजी एक राजपत्र अधिसूचना (गॅझेट नोटिफिकेशन) जारी करून गृह मंत्रालयाने माहिती दिली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठीचे आरक्षण १० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. यासंदर्भात १८ डिसेंबर रोजी एक राजपत्र अधिसूचना (गॅझेट नोटिफिकेशन) जारी करून गृह मंत्रालयाने माहिती दिली आहे. सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-गजेटेड) रिक्रूटमेंट रूल्स, २०१५’ मध्ये बदल केले आहेत.

यासोबतच, माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट मिळणार आहे, तर नंतरच्या तुकड्यांना वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात येणार आहे. ‘बीएसएफ’मध्ये कॉन्स्टेबल भरतीच्या पहिल्या टप्प्यात माजी अग्निवीरांसाठी आरक्षित केलेल्या ५० टक्के जागा भरण्याचे काम नोडल फोर्स करेल. दुसऱ्या टप्प्यातील भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) करेल. यात ते उमेदवार असतील जे अग्निवीर नाहीत. पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेली पदेही या दुसऱ्या टप्प्यात भरली जातील. ‘बीएसएफ’चे डायरेक्टर जनरल दरवर्षी गरजेनुसार महिला उमेदवारांच्या जागा निश्चित करतील.

याव्यतिरिक्त, माजी अग्निवीरांना शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी द्यावी लागणार नाही. तथापि, इतर उमेदवारांप्रमाणे माजी अग्निवीरांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. अग्निवीर होण्यासाठी १७.५ ते २१ वर्षे वय असणे आवश्यक आहे. तसेच, किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १०वी उत्तीर्ण होऊन भरती झालेल्या अग्निवीरांना ४ वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर १२वीच्या समकक्ष प्रमाणपत्र दिले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in