PM आवासची चावी देताना BJP खासदाराने विचारले - कोणी पैसे तर नाही घेतले ना? महिला म्हणाली- हो, 30 हजार दिले!

एका वृद्ध महिलेने भाजप खासदार आणि अन्य नेत्यांसमोरच सरकारी योजनांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यामुळे आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
PM आवासची चावी देताना BJP खासदाराने विचारले - कोणी पैसे तर नाही घेतले ना? महिला म्हणाली- हो, 30 हजार दिले!

पैसे दिल्याशिवाय सरकारी काम पुढे सरकत नाही असे म्हटले जाते. सरकारी योजनांमध्ये कशाप्रकारे पैसे लाटले जातात याचे उदाहरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील बदायू येथे 'विकसीत भारत संकल्प यात्रे'त भाजपचे खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी 'पीएम आवास योजने'ची लाभार्थी असलेल्या एका वृद्ध महिलेला घराची चावी दिली. यावेळी त्यांनी महिलेसमोर माईक पकडून "कोणी पैसे तर नाही घेतले ना?", असा प्रश्न विचारला. महिला नाही बोलेल असे अपेक्षित होते. पण, महिला चक्क हो म्हणते आणि तिच्याकडून किती रुपये लाच घेतली गेली ती रक्कमही सांगून टाकते. एका वृद्ध महिलेने भाजप खासदार आणि अन्य नेत्यांसमोरच सरकारी योजनांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यामुळे आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बदायू येथे 'विकसीत भारत संकल्प यात्रे'तील लाभार्थ्यांना बरेलीतील आंवला मतदार संघाचे खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्याकडून घरांची चावी दिली जात होती. यावेळी ते लाभार्थ्यांकडून त्यांचा अनुभव आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान, ते उसावा येथील वृद्ध महिला शारदा देवी यांना घराची चावी देतात आणि "घर मिळालं, कसं वाटतंय? असे विचारतात. त्यावर, चांगलं वाटतंय असे शारदा देवी सांगतात. पुढे, कोणी पैसे तर नाही ना घेतले?" असे खासदार कश्यप विचारतात. त्यावर महिला हो म्हणते. मग, किती रुपये दिले? असे खासदार विचारतात. त्यावरही महिला स्पष्टपणे 30 हजार रुपये द्यावे लागल्याचे सांगते. नीट ऐकू न आल्याने खासदार पुन्हा किती पैसे दिल्याचे विचारतात. महिला परत तेच उत्तर देते. ते ऐकून उपस्थित अन्य नेते, कार्यकर्ते हसू लागतात. तेव्हा, हा गंभीर मुद्दा असल्याचे खासदार म्हणतात. त्यानंतर, "मोदीजींना काही सांगू इच्छिता? धन्यवाद देणार का?", असा प्रश्न खासदार विचारतात. त्यावर महिला "हो धन्यवाद द्यायचे आहेत", असे म्हणते. ही घटना घडली त्यावेळी भाजपचे अनेक स्थानिक नेते, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. महिलेचे उत्तर ऐकून सर्वजण हसताना आणि महिलेचे म्हणणे टाळताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यावर अनेकजण व्यक्त होत आहेत.

चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश-

आम्ही हे संपूर्ण प्रकरण तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे भाजपचे बदायू जिल्हाध्यक्ष राजीव गुप्ता यांनी सांगितले आहे. तर, प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती बदायूचे जिल्हाधिकारी मनोज कुमार यांनी दिली आहे.

समाजवादी पक्षाने साधला निशाणा -

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. "जेव्हा महिला माईकवर लाईव्ह सांगत आहे की, तिच्याकडून पैसे घेतले गेले, तर चौकशी कसली करता? या प्रकरणावर तर कारवाई व्हायला हवी. प्रत्येक योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यासोबत हेच होत आहे", अशी प्रतिक्रिया बदायूचे माजी खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in