
मुंबई : ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया’मार्फत (आयसीएसआय) नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ऑल इंडिया टॉपरमध्ये दोन विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यामध्ये हैदराबादचा हेरंब माहेश्वरी आणि तिरुपतीचा ऋषभ ओसवाल यांनी प्रत्येकी ८४.६७ टक्के गुण मिळवले, तर ऑल इंडिया सेकंड रँकवर अहमदाबादच्या रिया शहा हिने ८३.५० टक्के गुण मिळवत आपले नाव कोरले आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया’ने सीएची अंतिम परीक्षा नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित केली होती. ‘गट १’ची परीक्षा ३, ५ आणि ७ नोव्हेंबर रोजी, तर ‘गट २’ची परीक्षा ९, ११ आणि १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या परीक्षेला ६६ हजार ९८७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११ हजार २५३ विद्यार्थी ‘गट-१’ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, तर ४९ हजार ४५९ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५६६ विद्यार्थी ‘गट-२’च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ‘गट-१’ परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी १६.८ टक्के होती, तर ‘गट-२’मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी २१.३६ टक्के होती. यामध्ये दोन्ही गटांतून परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १३.४४ टक्के होती.
अहमदाबादची रिया कुंजन कुमार शहाला दुसरा क्रमांक
या परीक्षेत हैदराबादच्या हेरंब माहेश्वरी आणि तिरुपतीच्या ऋषभ ओसवाल यांना ५०८ म्हणजे ८४.६७ टक्के गुण मिळाले आहेत. या दोघांनाही ऑल इंडिया रँक (एआयआर) वन मिळाले आहे, तर अहमदाबादच्या रिया कुंजन कुमार शहाने ५०१ गुण म्हणजे ८३.५० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच कोलकात्याची किंजल अजमेरा हिने ४९३ म्हणजे ८२.१७ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.