
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केला जाईल, अशी मोठी घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. सीएएबाबत मुस्लिमांची दिशाभूल केली जात असून त्यांना भडकावले जात आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७० आणि एनडीएला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.
CAA हा देशाचा कायदा आहे, त्याची अधिसूचना नक्कीच काढली जाईल. निवडणुकीपूर्वीच या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. याबाबत कोणालाही कोणताही संभ्रम नसावा, असे अमित शाह 'ईटी नाऊ-ग्लोबल बिझनेस समिट'मध्ये म्हणाले.
"आपल्या देशातील अल्पसंख्याकांना, विशेषत: मुस्लिम समुदायाची दिशाभूल केली जात आहे आणि CAA विरोधात भडकवले जात आहे. CAA कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेऊ शकत नाही. कारण, कायद्यात तशी तरतूदच नाही. CAA फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात अत्याचार सहन करून भारतात आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी आहे."
पुढे बोलताना गृहमंत्र्यांनी काँग्रेसवर CAA लागू करण्याच्या आश्वासनापासून मागे हटल्याचा आरोप केला. "सीएए हे काँग्रेस सरकारचे वचन होते. जेव्हा देशाची फाळणी झाली आणि त्या देशांमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत आहे आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण, आता ते मागे हटत आहेत." सीएए कायदा नागरिकत्व देण्यासाठी आणला आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही, यावर शाह यांनी जोर दिला. सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व हिसकावून घेतलं जाणार नाही. कारण तशी तरतूदच या कायद्यात करण्यात आलेली नाही, असा पुनरुच्चार देखील शाह यांनी केला.
आगामी निवडणुकांबद्दल बोलताना, नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल, भाजपला ३७० आणि एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'आम्ही (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे कलम ३७०) रद्द केले आहे. त्यामुळे देशातील जनता भाजपला ३७० आणि एनडीएला ४०० हून अधिक जागांवर आशीर्वाद देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत कोणताही सस्पेन्स नाहीये. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना देखील हे समजले आहे की त्यांना पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागेल, असेही ते म्हणाले.