

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून बंडखोर टीएमसी गटाचे रितब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केली. ही नियुक्ती कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच अखरुज्जमान यांची मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्तीही न्यायालयाने रद्द केली. न्या. कृष्णा राव यांनी विधानसभा अध्यक्ष रथिंद्र बोस यांना विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद यांच्या नियुक्तीचा नव्याने विचार करण्याचे निर्देश दिले. कायद्यानुसार १० दिवसांत हा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
टीएमसी नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी या नियुक्त्यांना आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यांच्या नावाची शिफारस नाकारून रितब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती केल्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला होता.
मे महिन्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर ३ जून रोजी अध्यक्षांनी बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. बंडखोर गटाने टीएमसीच्या ८० आमदारांपैकी ५८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. बॅनर्जी उलुबेरिया पूर्व मतदारसंघातून, तर अखरुज्जमान रघुनाथगंज मतदारसंघातून निवडून आले होते.