

कोलकाता : नंदिग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत 'आयएसएफ'कडून 'पाकिट' हे चिन्ह नव्याने स्थापन झालेल्या 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस'ला देण्याच्या निर्णयावरून कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला चांगलेच सुनावले. "निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे," अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
निवडणूक आयोगाकडे १८३ मुक्त (स्वतंत्र) चिन्हे उपलब्ध असताना, पश्चिम बंगालमधील नंदिग्राम पोटनिवडणुकीत हेच 'पाकिट' चिन्ह नवीन पक्षाला देण्याचे काय कारण होते, असा सवाल न्यायालयाने केला. या मतदारसंघात आयएसएफनेही आपला उमेदवार उभा केला आहे. न्यायालयाने टिप्पणी करताना स्पष्ट केले की, ते चिन्ह आरक्षित ठेवायला हवे होते. "संबंधित प्राधिकरणाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे," असे न्यायमूर्ती कृष्णा राव यांनी नमूद केले.