मणिपूर तत्काळ शांत करा! सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोदी सरकारला घरचा आहेर

गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
मणिपूर तत्काळ शांत करा! सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोदी सरकारला घरचा आहेर

नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली.

ते म्हणाले की, देशात शांतता हवी आहे. प्रत्येक ठिकाणी व समाजात वाद उपयोगाचा नाही. गेल्या वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. यापूर्वी तो दहा वर्षे शांत होता. जुन्या काळातील एकोप्याने राहण्याची संस्कृती नाहीशी झाली असे वाटत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार अचानक सुरू झाला की तो मुद्दामहून सुरू करण्यात आला, हे माहीत नाही. पण त्या आगीत तो अजूनही धुमसत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार? आता त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले.

निवडणूक हे युद्ध नसून ती एक स्पर्धा आहे. आता निवडणूक झाली, निकाल लागला. सरकार स्थापन झाले. तरीही हे कसे घडले? काय झाले?, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी निवडणुका होत असतात. प्रत्येक निवडणुकीत आपले कर्तव्य आपण पार पाडतो. यंदाही ते केले आहे, असे भागवत म्हणाले.

विरोधी पक्ष नव्हे ‘प्रतिपक्ष’ म्हणा

निवडणूक सहमती बनवण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू समोर आल्या पाहिजेत. त्यासाठीच ही व्यवस्था आहे. निवडणूक प्रचारात एकदुसऱ्यावर जोरदार टीका करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे, खोटी वृत्त प्रकाशित करणे अयोग्य आहे. विरोधी पक्षाला ‘प्रतिपक्ष’ असे म्हटले पाहिजे. निवडणुकीच्या चष्म्यातून मुक्त होऊन देशासमोरील समस्यांचा विचार करायला हवा, असा सल्ला भागवत यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in