देशात धाडसत्र सुरु; महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये व्यापाऱ्यांवर आयकर छापे

दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थांवर छापे टाकण्यात आले.
देशात धाडसत्र सुरु; महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये व्यापाऱ्यांवर आयकर छापे

आयकर विभागाने बुधवारी देशभरात १०० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडसह सात राज्यांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले. हे छापे मद्य घोटाळा, मिड डे मिल, राजकीय निधी आणि करचोरीशी संबंधित आहेत.

दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थांवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने नोंदणी असलेल्या मात्र मान्यता न मिळालेल्या २०पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंगप्रकरणीही कारवाई केली आहे.

राजस्थानचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ५३हून अधिक ठिकाणांवर आयकरचे छापे पडले आहेत. बुधवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे. हे प्रकरण मिड डे मिल पुरवठ्याशी संबंधित आहे. कोटपुतली येथे मिड डे मिलचा पुरवठा करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकण्यात आला आहे. जयपूरमधील त्यांच्या सरकारी आणि खासगी निवासस्थानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आयकर विभागाच्या टीम पोहोचल्या असून, झडती घेण्यात येत आहे. छत्तीसगडमधील रायगड येथील एका व्यावसायिकाच्या घरीही आयकरची कारवाई सुरू आहे.

यूपीतील २४ शहरांमध्ये छापे

आयकर विभागाने यूपीच्या २४ शहरांमध्ये छापे टाकले आहेत. राजधानी लखनौमध्ये बुधवारी सकाळी आयकर विभागाची टीम राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे प्रमुख गोपाल राय यांच्या घरी पोहोचली. गोपाल राय सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ग्रीव्हन्स अॅण्ड इन्व्हेस्टिगेशन नावाची संस्था चालवतात. ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरी कागदपत्रांची छाननी सुरू आहे. हे प्रकरण राजकीय निधी आणि करचुकवेगिरीशी संबंधित आहे.

बंगळुरूमध्ये करचोरी प्रकरण

आयकर विभागाच्या टीमने बंगळुरूमध्ये २०हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मणिपाल ग्रुपवरही कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व छापे आयकरचोरीशी संबंधित आहेत. यासंदर्भात आयकर विभागाला माहिती मिळाली होती.

ममतांच्या मंत्र्यांशी संबंधित सहा ठिकाणी ‘सीबीआय’चे छापे

ममता सरकारचे कायदामंत्री मलय घटक यांच्या सहा ठिकाणांवर ‘सीबीआय’ने बुधवारी सकाळी छापे टाकले. घटक यांच्यावर कोळसा तस्करीचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीबीआय’ची तीन पथके सकाळी ८ वाजल्यापासून घटक यांच्या निवासस्थानासह सहा ठिकाणी शोध घेत आहेत. त्यापैकी कोलकात्यात पाच ठिकाणी आणि आसनसोलमधील एका ठिकाणी टीम दाखल झाल्या आहेत.

स्टील-दारू व्यापारी निशाण्यावर

छत्तीसगडमध्ये काही मद्यविक्रेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये अमोलक सिंग या मोठ्या दारू व्यावसायिकाचा समावेश आहे. रामदास अग्रवाल, त्यांचा मुलगा अनिल, ऐश्वर्या किंगडमच्या आरके गुप्ता यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. हे प्रकरण दारू घोटाळा आणि करचुकवेगिरीशी संबंधित आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबादमध्येही धाडी

मुंबई, पुणे व औरंगाबादमध्ये शाळेतील मुलांना पुरवण्यात येणाऱ्या मिड डे मिल योजनेसाठी अन्नधान्य पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांवर बुधवारी आयकर विभागाने धाडी टाकल्या. यामध्ये शिवसेना नेत्यांच्या नातेवाईकांशी संबंधित व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. औरंगाबादमध्ये शिवसेनेशी संबंधित बडे उद्योजक सतीश व्यास यांच्या ज्योतिनगर येथील निवासस्थानी आयकर विभागाच्या पथकाने झडती घेतली. व्यास यांच्या निवासस्थानासह इतर तीन ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या. सकाळी ४ वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली. व्यास कुटुंबीय हे आधीपासून शिवसेनेशी जवळीक ठेवून आहेत. सतीश व्यास यांचे पुत्र मिथुन सतीश व्यास हे युवासेनेचे जिल्हा चिटणीसपदावर कार्यरत आहेत. सतीश व्यास यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे व औरंगाबादमधील ठिकाणांवर आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकून झडती घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in