शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याचे अमित शहा यांचे आदेश; कॅनडाच्या मंत्र्याचा खळबळजनक आरोप

कॅनडातील फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्यासाठी हिंसक मोहिम राबवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचा आरोप आता कॅनडाच्या एका मंत्र्याने केल्याने खळबळ माजली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

ओट्टावा : कॅनडातील फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्यासाठी हिंसक मोहिम राबवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचा आरोप आता कॅनडाच्या एका मंत्र्याने केल्याने खळबळ माजली आहे. मात्र अशा प्रकारचा आरोप करताना कॅनडाने त्याबाबतचा कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे भारताने या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

कॅनडातील काही हिंसक घटनांप्रकरणी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सरकारने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कॅनडातील हिंसक घटनांमध्ये हात असल्याचा आरोप कॅनडा सरकारने केला आहे. यापूर्वी कॅनडाने भारताचे उच्चायुक्त संजयकुमार वर्मा यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप केले होते. तेव्हा भारताने त्या आरोपांचे खंडन केले होते.

याबाबत एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडातील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याच्या प्रकरणात अमित शहा यांचाही सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. कॅनडाचे उपपरराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी संसदीय समितीला सांगितले की, शीख फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शहा यांचा हात आहे. हिंसाचारामागे असणारी व्यक्ती अमित शहा आहे का, असा प्रश्न एका पत्रकाराने आपल्याला विचारला होता त्याला आपण पुष्टी दिली, असे मॉरिसन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कॅनडाने कोणत्याही पुराव्यांशिवाय केलेल्या आरोपांवर भारताने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

कॅनडाकडून भारतविरोधी शक्तींना वाढते पाठबळ

भारत आणि कॅनडाचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सातत्याने भारतविरोधी शक्तींना देशात आश्रय देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, कॅनडातील काही हिंसक घटनांप्रकरणी ट्रुडो सरकारने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. परंतु, भारताने ते आरोप फेटाळले आहेत. त्यापाठोपाठ भारताने आपले कॅनडातील उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे. त्यानंतर कॅनडाचे भारतातील अधिकारी देखील मायदेशी परतले आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताच्या कथित सहभागाबाबतच्या आरोपानंतर भारत व कॅनडाचे संबंध सध्या बिघडले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in