निज्जरची हत्या भारतानेच केली कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा पुन्हा आरोप

भारतीय राजकीय मुत्सद्यांसोबत आम्ही काम करत राहू. हे युद्ध नव्हे. जे आम्हाला सुरूच ठेवायचे आहे.
निज्जरची हत्या भारतानेच केली कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा पुन्हा आरोप

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याची हत्या भारतानेच केली, असा आरोप पुन्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. भारतातून बाहेर काढलेल्या ४० कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. कॅनडाचा नागरिक व खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची जूनमध्ये ब्रिटिश कोलंबिया प्रांतात एका गुरुद्वाराबाहेर हत्या केली होती. या हत्येचा आरोप ट्रुडो यांनी भारतावर ठेवला आहे.

ट्रुडो म्हणाले की, या प्रकरणी आम्ही गंभीर असून भारतासोबत काम करू इच्छितो. पूर्वीपासून आम्ही वास्तविक आरोप हे जाहीर केले आहेत. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ इच्छितो. या प्रकरणाच्या गंभीरतेप्रकरणी भारत सरकार व जगातील अनेक देशांशी संपर्क केला आहे. ट्रुडो पुढे म्हणाले की, भारताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. नवी दिल्लीतून ४० हून अधिक राजकीय मुत्सद्यांना मनमानीपणे परत पाठवले. या बाबीमुळे आम्ही निराश आहोत. भारत सरकारचे एजंट‌्स‌ कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येत सामील असू शकतात.

भारतासोबत काम करत राहणार

भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना काढून टाकल्याप्रकरणी ते म्हणाले की, ही बाब जगभरातील देशांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. दुसऱ्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा पाहायची नाही, असे एखाद्या देशाने ठरवल्यास त्यातून आंतरराष्ट्रीय संबंध धोकादायक बनतात. प्रत्येक वेळी आम्ही भारतासोबत सकारात्मकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. भारतीय राजकीय मुत्सद्यांसोबत आम्ही काम करत राहू. हे युद्ध नव्हे. जे आम्हाला सुरूच ठेवायचे आहे. आम्ही कायमच कायद्याच्या राज्यासाठी एकत्रित उभे राहू, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, निज्जर याच्या हत्येमुळे आंतरराष्ट्रीय कायदा व लोकशाही व सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे. आम्ही अमेरिकेसारख्या सहयोगी देशांशी संपर्क साधला. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेत आहोत. आम्ही सर्व साथीदारांसोबत काम करणे सुरूच ठेवू. कारण तपास यंत्रणा व अंमलबजावणी यंत्रणा आपले काम करत असतात, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in