
भूज : देशाच्या सीमेवरील एक इंच जागेबाबतही भारत तडजोड करू शकत नाही. देशाचे रक्षण करण्यास आपले सशस्त्र जवान सक्षम आहेत याचा देशवासीयांना विश्वास आहे. भारतीय सशस्त्र दलांकडे पाहिल्यावर देशाच्या दुष्मनांना त्यांच्या भयंकर योजनांची अखेर झालेली जाणवते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवरील सीर खाडीजवळ मोदी यांनी देशाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते.
जवानांमुळेच देशवासीयांमध्ये ते सुरक्षित असल्याची भावना आहे, जेव्हा जग तुमच्याकडे पाहते तेव्हा त्यांना भारताच्या सामर्थ्याची कल्पना येते, जेव्हा दुष्मन तुमच्याकडे पाहतात तेव्हा त्यांना त्यांच्या भयंकर योजनांची अखेर दिसते, असे मोदी यांनी लष्कर, सीमा सुरक्षा दल, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांना संबोधताना सांगितले.
देशाच्या सीमेवरील एक इंच जागेबाबतही तडजोड करू शकत नाही, असे देशातील सध्याचे सरकार आहे. लष्कराच्या सामर्थ्यावर सरकारचा विश्वास आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल ही तीन स्वतंत्र दले आहेत, मात्र ही दले जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या सामर्थ्याची अधिक कल्पना येते. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश झपाट्याने पावले टाकत आहे आणि तुम्ही या स्वप्नाच्या पूर्ततेचे रक्षक आहात, असे मोदी यांनी जवानांना संगितले.