Sandeshkhali : शहाजहान शेख अखेर सीबीआयच्या हवाली

Sandeshkhali : शहाजहान शेख अखेर सीबीआयच्या हवाली

शहाजहान शेख याला सीबीआयच्या हवाली करण्यावरून कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढल्यानंतर आणि त्यासाठी मुदत निश्चित केल्यानंतर अखेर शहाजहान याला गुन्हा अन्वेषण विभागाने बुधवारी सीबीआयच्या हवाली केले.
Published on

कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला सीबीआयच्या हवाली करण्यावरून कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढल्यानंतर आणि त्यासाठी मुदत निश्चित केल्यानंतर अखेर शहाजहान याला गुन्हा अन्वेषण विभागाने बुधवारी सीबीआयच्या हवाली केले.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे एक पथक भवानी भवन येथे सायंकाळी चार वाजण्यापूर्वीच पोहोचले. शहाजहान याला सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत सीबीआयच्या हवाली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही शेख याचा सीबीआयला प्रत्यक्ष ताबा सायंकाळी ६.४८ वाजता देण्यात आला.

शहाजहान शेख याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचे राज्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जवळपास दोन तास प्रतीक्षा केल्यानंतरही मंगळवारी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने शेख याला सीबीआयच्या ताब्यात दिले नव्हते.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने गुन्हा अन्वेषण विभागाने शहाजहान शेख याला सीबीआयच्या ताब्यात दिले नव्हते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in