नवी दिल्ली : देशात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या मुसक्या आवळायला सरकारने सुरुवात केली आहे. सीबीआयने ‘ऑपरेशन चक्र-२’ अंतर्गत ७६ ठिकाणी छापेमारी केली.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, पंजाब, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश व प. बंगालसहित ७६ ठिकाणी छापे मारले. यावेळी अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. सीबीआयने या प्रकरणी ५ गुन्हे दाखल केले आहेत.
ॲॅमेझॉन व मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांच्या तक्रारीवरून सीबीआयने ही कारवाई केली. ३२ मोबाईल फोन, ४८ लॅपटॉप, दोन सर्व्हरची छायाचित्र, ३३ सीमकार्ड व पेनड्राइव्ह जप्त केले. तसेच १५ ई-मेल खात्यांतील माहिती जप्त केली. हे आरोपी ५ राज्यांत ९ कॉल सेंटर चालवत होते. तांत्रिक मदत प्रतिनिधी म्हणून स्वत:ची ओळख देत ते संघटितपणे परदेशी नागरिकांना फसवत होते. सीबीआयच्या कारवाईत क्रिप्टोचलनाच्या फसवणुकीच्या मोहिमेचा भंडाफोड केला. बनावट क्रिप्टो मायनिंग फसवणुकीत भारतीय नागरिकांची फसवणूक केली जाते. यामुळे नागरिकांना १०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. ‘ऑपरेशन चक्र-२’ मोहिमेंतर्गत पुरावे गोळा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हेगारी संपवण्यासाठी व्यापक कारवाई केली जात आहे.