सीबीआय कडुन लालू प्रसाद यादव यांच्या घरावर छापा
सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. लालू प्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवींसह मुलीविरोधातही सीबीआयने कारवाई केली आहे. लालू आणि त्यांच्या मुलीने आपल्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. गेल्या महिन्यामध्येच लालूप्रसाद यांना झारखंड कोर्टाकडून चारा घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला होता.
रेल्वेमंत्री असताना लाच
स्वीकारल्याचा आरोप
सीबीआयने लालूंच्या दिल्ली, पाटणा आणि गोपालगंजमधील ठिकाणांवर छापा टाकला आहे. यादव यांनी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री असताना लोकांना नोकऱ्या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याच्या आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, सीबीआयच्या छाप्यांच्या निषेधार्थ आरजेडीचे नेते आणि कार्यकर्ते पाटणाच्या रस्त्यावर उतरले व त्यांनी निदर्शने केली. लालू यादव यांचे भाऊ प्रभुनाथ यादव यांनी सीबीआयच्या या कारवाईवर टीका केली आहे. हा आरजेडी प्रमुखांना अडचणीत आणण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘एखाद्या आजारी व्यक्तीला जाणूनबुजून अशा प्रकारे त्रास दिला जातो हे दुर्दैवी आहे. यामागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे,’ असे प्रभुनाथ म्हणाले.