‘सीबीआय’ केजरीवाल यांना अटक करेल, 'आप'चा दावा

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) येत्या काही दिवसांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची योजना आखत आहे आणि संध्याकाळपर्यंत त्यांना नोटीस बजावेल, असा दावा 'आप'ने शुक्रवारी केला.
‘सीबीआय’ केजरीवाल यांना अटक करेल, 'आप'चा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) येत्या काही दिवसांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची योजना आखत आहे, असा दावा 'आप'ने शुक्रवारी केला.

केजरीवाल यांना कोणत्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे, हे पक्षाने सांगितले नसले तरी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाला काँग्रेससोबत युती करण्यापासून रोखण्यासाठी हे केले जात आहे, कारण भाजप या दोन पक्षांना घाबरत आहे, असे आपकडून सांगण्यात आले. आपच्या दाव्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाकडून त्वरित प्रतिसाद मिळाला नसला, तरी भाजपने म्हटले आहे की आप नेते गोंधळ निर्माण करण्याचा आणि केजरीवाल यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये दिल्ली, गुजरात आणि हरयाणामध्ये जागावाटपाचा करार होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही बाजूंमधील बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आणि आपचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, काँग्रेस आणि आपमधील जागावाटपाच्या चर्चेला अंतिम रूप देण्याचे वृत्त येताच ईडीने केजरीवाल यांना अबकारी धोरणप्रकरणी सातवे समन्स पाठवले. आप-काँग्रेस युती झाल्यास अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल, असे संदेश आम्हाला मिळत आहेत. यावर दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, केजरीवाल यांना माहीत आहे की आप आणि काँग्रेसच्या युतीबाबतची चर्चा अयशस्वी होत आहे. परंतु आपचे नेते गुरुवारपासून अफवा पसरवत आहेत आणि मुख्यमंत्र्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in