

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीवरून सुरू असलेल्या तीव्र वादानंतर केंद्र सरकारने मंगळवारी मोठी कारवाई केली. या डिजिटल मूल्यमापन पद्धतीतील कथित अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासांतच सीबीएसईच्या नेतृत्वातच मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची सीबीएसईचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर वरुण भारद्वाज हे बोर्डाचे नवीन सचिव असतील.
२००१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले प्रशांत लोखंडे सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी आता राहुल सिंग यांची जागा घेतली असून, सिंग यांची कृषी मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तसेच, वादग्रस्त ठरलेले सचिव हिमांशू गुप्ता यांना मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले असून, त्यांच्या जागी शिक्षण मंत्रालयातील वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तांत्रिक त्रुटी, गुणदानातील गोंधळामुळे असंतोष
यावर्षी इयत्ता १२ वीच्या परीक्षांसाठी ही ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (ओएसएम) पद्धत लागू करण्यात आली होती, ज्यामध्ये छापील उत्तरपत्रिकांऐवजी स्कॅन केलेल्या डिजिटल प्रतींचे मूल्यमापन केले गेले. मात्र, एका वादग्रस्त खाजगी कंपनीला याचे कंत्राट देणे, तांत्रिक त्रुटी आणि गुणदानातील गोंधळ यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
दरम्यान, वाढता विरोध पाहता सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन संकेतस्थळ सुरू केले असून ते ६ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत उघडे राहील. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच आपल्या उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवली आहे, तेच या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतील.
कोण आहेत प्रशांत लोखंडे?
प्रशांत लोखंडे हे २००१ तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई. आणि मुंबईच्या एनआयटीआयईमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे. १ एप्रिल २०२६ पासून ते नवी दिल्ली येथील गृह मंत्रालयात अपर सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सहसचिव, संचालक, खासगी सचिव, सल्लागार उपायुक्त, सचिव यांसारख्या विविध पदांवर काम केले आहे. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल दोनदा ‘राज्य पुरस्कार (सुवर्ण)’ देऊन गौरविण्यात आले आहे. ते इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांत पारंगत आहेत.