CBSE Results 2024 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर; बघा डिटेल्स

यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीमध्ये तिरुअनंतपुरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
CBSE Results 2024 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर; बघा डिटेल्स

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) आज, १३ मे रोजी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा देशभरात दहावीचा ९३.६० टक्के आणि बारावीचा ८७.९८ टक्के निकाल लागला आहे. १२वीमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६.४० टक्के लागला असून ९१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या निकालात पुणे सहाव्या क्रमांकावर आहे, तर बारावीच्या निकालात पुणे नवव्या क्रमांकावर आहे.

२०२३मध्ये सीबीएसईच्या १२वी परीक्षेत ९०.६८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी ही टक्केवारी ९१.५२ एवढी झाली आहे. यंदाच्या १२वीच्या निकालामध्ये तिरुअनंतपुरममध्ये सर्वाधिक ९९.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सीबीएसईच्या १० वीच्या परीक्षेत देखील तिरुअनंतपुरममध्ये ९९.७५ टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीमध्ये तिरुअनंतपुरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

१०वी आणि १२ वीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची आकडेवारी

यंदा सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत १६ लाख ३३ हजार ७३० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यात १६ लाख २१ हजार २२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीच्या परीक्षेत १४ लाख २६ हजार ४२० विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच दहावीच्या परीक्षेत २२ लाख ५१ हजार ८१२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील २२ लाख ३८ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, दहावीच्या परीक्षेत २० लाख ९५ हजार ४६७ विद्यार्थी पास झाले आहेत.

सीबीसीएसई बोर्डाचा निकाल असा बघा

  • सीबीसीएसई बोर्डाच्या results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in संकेतस्थळावर लॉग इन करा.

  • त्यानंतर दहावी किंवा बारावी निकालावर क्लिक करा

  • नंतर विद्यार्थ्यांचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकावा

  • यानंतर तुम्हाला सीबीएसईचा निकाल पाहता येईल.

logo
marathi.freepressjournal.in