सीबीएसई मोठा बदल करण्याच्या तयारीत, २०२६ पासून दहावीची वर्षातून दोनदा परीक्षा?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.
सीबीएसई मोठा बदल करण्याच्या तयारीत, २०२६ पासून दहावीची वर्षातून दोनदा परीक्षा?
Published on

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ‘सीबीएसई’ने २०२६ पासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच ‘सीबीएसई’चे अधिकारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. दोनदा परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाची यावेळी चर्चा करण्यात आली.

एखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा काही कारणाने त्याची परीक्षा चुकली तर तो पुन्हा परीक्षेला बसू शकतो. त्याचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल, त्यावर लोकांकडून सूचना मागवल्या जातील. तसेच ‘सीबीएसई’ मंडळाकडून त्यांच्या २६० संलग्न परदेशी शाळांसाठी जागतिक अभ्यासक्रम सादर केला जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिक्षण मंत्रालयाने जागतिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई अधिकाऱ्यांसह आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), केंद्रीय विद्यालय संघटना (केव्हीएस) आणि नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस) च्या प्रमुखांशी या मसुद्याच्या अभ्यासक्रमावर सविस्तर चर्चा केली. हा मसुदा पुढील आठवड्यात सोमवारी सार्वजनिक करण्याचे नियोजन आहे. जागतिक अभ्यासक्रमात प्रमुख भारतीय विषयांचा समावेश केला जाणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०ची अंमलबजावणी करण्यासाठी आणलेल्या ‘एनसीएफ’ने शिफारस केली की, “विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दोनदा बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, फक्त सर्वोत्तम गुण राखून ठेवावेत. त्यानुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा परीक्षा देणे बंधनकारक नाही. एकदा येणाऱ्या संधीच्या भीतीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय दिला जात आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेतील गुणांनी समाधान झाले नाही तर, तो पुढच्या वेळी पुन्हा परीक्षेला बसू शकतो. वर्षाच्या दोन्ही बोर्ड परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे फक्त सर्वोत्तम गुण विचारात घेतले जातील. निकालाची गुणवत्ता सर्वोत्तम गुणांच्या आधारे निश्चित केली जाईल.”

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली जात आहे. "तणावमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ही आवश्यक पावले आहेत. परीक्षांमध्ये सुधारणा आणि बदल हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सुधारणांमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी होण्यास मदत होईल.”

logo
marathi.freepressjournal.in