भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; दोन्ही देशांत सोमवारी दुपारी १२ वाजता महत्त्वपूर्ण चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शस्त्रसंधीची माहिती दिल्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर अवघ्या ४२ सेकंदात त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा करून पत्रकार परिषद संपवली.
India Pakistan Casefire
India Pakistan Casefire
Published on

नवी दिल्ली : मागील तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला शस्त्रसंघर्ष शनिवारी थांबला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा भारतासमोर ‘युद्धविरामा’चा प्रस्ताव ठेवला व त्यास भारताने मान्यता देऊन शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून तात्काळ युद्धविरामाची घोषणा केली. उभय देशातील संघर्ष मिटविण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत असतानाच, हा युद्धविराम कोणाच्याही मध्यस्थीशिवाय झाला असल्याची घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शस्त्रसंधीची माहिती दिल्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर अवघ्या ४२ सेकंदात त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा करून पत्रकार परिषद संपवली.

मिसरी म्हणाले की, शनिवारी दुपारी ३.३५ वाजता पाकिस्तानच्या लष्करी परिचलन महासंचालयाच्या अधिकाऱ्याने (डीजीएमओ) भारताच्या डीजीएमओला फोन केला. त्यांच्यात युद्धविरामाची चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देश युद्धविरामाला तयार झाले. जमीन, आकाश, पाणी येथून सायंकाळी ५ वाजल्यापासून तात्काळ युद्धविराम लागू झाला असून १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे.

यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास ते युद्ध असेल; भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादाबाबत भारताने शनिवारी कठोर भूमिका जाहीर केली. यापुढे पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यास युद्ध समजले जाईल. त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्र सरकारने एका सूत्राच्या हवाल्याने दिला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद‌्ध्वस्त करून घेतला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन, क्षेपणास्त्राचा मारा सुरू केला होता. तसेच सर्वसामान्य नागरिक व लष्करी तळांना लक्ष्य केले जात होते. तथापि, भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत.

युद्धविरामानंतर पंतप्रधान मोदी यांची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, सर्व सैन्य दलांचे प्रमुख, लष्करप्रमुख, नौदल प्रमुख व हवाई दल प्रमुख उपस्थित होते.

युद्धविरामाबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान झालेल्या तात्काळ युद्धविरामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी. सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केली आहे. तसेच गेले १८ दिवस सुरू असलेल्या विविध घटनांबाबत संसदेचे विशेष अधिवेशन सरकारने बोलवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, अमेरिकेकडून झालेल्या घोषणेमुळे, आता पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवणे आणि राजकीय पक्षांना विश्वासात घेणे ही पूर्वीपेक्षाही जास्त गरजेचे आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून गेल्या १८ दिवसांतील घटनांवर आणि पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी आणि सामूहिक दृढनिश्चय प्रदर्शित करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची जास्त गरज आहे.

'ऑपरेशन सिंदूर'

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी घडवून आणली मध्यस्थी

  • श्रीनगरमध्ये जनजीवन पूर्वपदावर

  • इंदिरा गांधी होना आसान नहीं, काँग्रेस आक्रमक

  • चुकीचे दावे करणाऱ्या पाकचा बुरखा भारताने फाडला

  • काश्मीरवर पुन्हा ड्रोन हल्ले आणि गोळीबार

  • यूएई, ब्रिटनकडून युद्धविरामाचे स्वागत

  • पीओकेमध्ये १३ जणांचा मृत्यू

  • शांतता आणि सुरक्षिततेसाठी काम करू, ट्रम्प यांचे आभार - पाक पंतप्रधान

पाकिस्तानचे पाच खतरनाक दहशतवादी ठार

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानामधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. या पाच खतरनाक दहशतवादी ठार झाले. यात १९९९ मध्ये कंदाहार विमान अपहरणाचा कट आखणाऱ्या दहशतवाद्यांपैकी मोहम्मद युसूफ अझहर उर्फ ​​उस्ताद जी उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​घोसी साहब याचा मृत्यू झाला. तसेच मुदस्सर खादियान खास उर्फ ​​मुदस्सर उर्फ ​​अबू जुंदाल, हाफिज मोहम्मद जमील, खालिद उर्फ ​​अबू आकाशा, मोहम्मद हसन खान हे सर्व दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित होते. या सर्वांचा खात्मा झाल्याने पाकिस्तान चिडला आहे.

पाकिस्तानची हवाई हद्द खुली

भारतासोबत शस्त्रसंधीनंतर हवाई हद्द सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुली झाल्याचे पाकिस्तानने जाहीर केले.

युद्धविरामानंतरही पाककडून हल्ले सुरूच

इस्लामाबाद :युद्धविरामानंतरही शनिवारी रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ले सुरूच ठेवले. भारताच्या सीमेत गोळीबार केला. उधमपूर येथे स्फोटाचे आवाज ऐकू आले. श्रीनगर, बारामुल्ला व छंब येथे गोळीबार व स्फोटाचे आवाज येत आहेत. राजौरीत ‘ब्लॅकआऊट’ केला आहे. कानाचक विभागात तीन ड्रोन दिसले. दरम्यान, भारताच्या जवानांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यांसह ७ जणांचा मृत्यू

जम्मू: पाकिस्तानने जम्मूत शनिवारी केलेल्या ड्रोन व उखळी तोफांच्या माऱ्यात ७ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले. मृतांमध्ये लष्करी अधिकारी, जम्मू-काश्मीर सरकारी अधिकाऱ्याचा समावेश आहे. अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा यांचे राजौरीमध्ये तोफांच्या माऱ्यात निधन झाले. तसेच सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज हे पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकच्या गोळीबारात मरण पावलेल्या प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. जम्मू शहर व जम्मू-काश्मिरातील महत्त्वाच्या शहरातील रहिवाशांना हवाई सायरनचे आवाज ऐकू येत होते. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार होत असल्याने सीमेवरील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून सातत्याने भारतात ड्रोन व क्षेपणास्त्र डागली जात होती. पाकिस्तानकडून भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघनाचे सातत्याने प्रयत्न होत होते.

  • दहशतवादाविरोधातील लढाई कायम-जयशंकर

    भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, भारत आणि पाकिस्तानाने शनिवारी सैन्य कारवाई रोखण्याबाबत सहमती दर्शवली असली तरी भारताची सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधातील कारवाई कायम सुरू राहिल.

  • अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच युद्धविराम- ट्रम्प

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर दावा केला की, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे झालेल्या चर्चेनंतर भारत व पाकिस्तानात तात्काळ व पूर्ण युद्धविराम झाला आहे. रात्रभर अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे चर्चा सुरू होती. त्यामुळेच भारत व पाकिस्तान हे तात्काळ युद्धविरामाला तयार झाले. दोन्ही देशांनी समजुतदारपणा दाखवून युद्धविराम केल्याने मला आनंद होत आहे, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली.

  • पाक परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?

    पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार म्हणाले की, 'पाकिस्तान आणि भारताने तात्काळ युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.

  • मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले स्वागत

    जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धविरामाचे मी स्वागत करतो. पाकच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला फोन करून चर्चा केली. उशीरा का होईना चांगले झाले.

logo
marathi.freepressjournal.in