केंद्राचे यूजीसीला कठोर कारवाईचे आदेश

जाधवपूर विद्यापीठ विद्यार्थी मृत्यू प्रकरण
केंद्राचे यूजीसीला कठोर कारवाईचे आदेश

नवी दिल्ली : कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विद्यापीठाने आणि यूजीसीने सादर केलेला अहवाल असमाधानकारक असल्याचे मत केंद्र सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठात प्रथम वर्षात शिकणाऱ्या स्वप्नदीप कुंडू नावाच्या विद्यार्थ्याचा काही दिवसांपूर्वी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर रॅगिंग आणि लैंगिक अत्याचार करून खून झाल्याचा आरोप केला होता. त्यावरून विद्यापीठाने विज्ञान शाखेचे अधिष्ठाता सुबेनॉय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने आणि यूजीसीने सादर केलेला अहवाल फारच वरवरचा आहे आणि असमाधानकारक आहे. त्यात घटनेच्या तपशिलांची नोंद नाही. तसेच, प्रत्यक्ष कारवाईचा उल्लेख नाही, असा आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केला आहे. प्रधान यांनी यूजीसीला दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, शनिवारी चौकशी समितीचे अध्यक्ष सुबेनॉय चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजवर १२ जणांना अटक केली आहे. त्यातील तिघांना शनिवारी अटक झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in