नीट-यूजी परीक्षेचे केंद्र-शहरनिहाय निकाल 'एनटीए'कडून जाहीर

एनटीएने शनिवारी नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
नीट-यूजी परीक्षेचे केंद्र-शहरनिहाय निकाल 'एनटीए'कडून जाहीर
Published on

नवी दिल्ली : एनटीएने शनिवारी नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

या परीक्षेचे निकाल ५ जून रोजी प्रथम जाहीर करण्यात आले होते. परीक्षेत फेपरफुटीसह अनेक गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात आले होते आणि त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे निकाल केंद्रनिहाय आणि शहरनिहाय जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

परदेशातील १४ शहरांसह देशातील ५७१ शहरांमधील चार हजार ७५० केंद्रांवर ५ मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेला २४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. उमेदवारांची ओळख जाहीर न करता निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

जी केंद्रे वादाच्या भोवऱ्यात होती त्या केंद्रांवर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ज्यांनी अन्य केंद्रांवर परीक्षा दिली त्यांच्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत का, याची खातरजमा करावयाची असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. या परीक्षेत अनियमितता झाल्याने ती रद्द करावी, फेरपरीक्षा घ्यावी आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा आदी मागण्यांसाठी याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर २२ जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in