शेतकरी, सरकारी कमर्चाऱ्यांना केंद्राचे दिवाळी गिफ्ट महागाई भत्यात ४ टक्के वाढ, ३० दिवसांचा पगार बोनस सहा पिकांच्या हमीभावात वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
शेतकरी, सरकारी कमर्चाऱ्यांना केंद्राचे दिवाळी गिफ्ट महागाई भत्यात ४ टक्के वाढ, ३० दिवसांचा पगार बोनस सहा पिकांच्या हमीभावात वाढ

नवी दिल्ली : आगामी पाच राज्यातील विधानसभा आणि त्यानंतर येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिवाळीचे औचित्य साधून केंद्र सरकारने शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना खूष करण्यासाठी दिवाळी भेटीचा वर्षाव केला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागार्इ भत्यात ४ टक्के वाढ करुन तो ४६ टक्क्यांवर नेला आहे, तसेच ३० दिवसांचा पगार बोनस देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी तीळ, मोहरी, मसूर, गहू, बाजरी, हरभरा आणि सूर्यफूल या सहा पिकांच्या हमीभावात वाढ करुन बळीराजाची दसरा-दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

एकीकडे विरोधी पक्ष आपापल्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर विविध प्रकारच्या फुकट योजना जाहीर करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसऱ्या बाजुला सरकार निवडणुकीआधीच खिरापत वाटप करुन मतदारांना खूष करुन या स्पर्धेत आपणही मागे नसल्याचे दाखवून देत आहे. महागाई भत्त्यात अपेक्षित वाढ झाल्याने बुधवारी सरकारी कर्मचारी खुशीत आहेत. केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआरमध्ये वाढीला मंजूरी देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी पण महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत, रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला. डीए आणि डीआरमध्ये वाढ केली. यामध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे डीए आणि डीआर ४६ टक्के झाला. दोन्ही जुलै महिन्यापासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्के वाढ करण्याची शक्यता होती. महागाईच्या आकड्यांनुसार भत्त्यात वाढ करण्यात आली.

कुणाला झाला फायदा

महागाई भत्यात वाढ झाल्याने सणावारापूर्वीच कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा फायदा झाला. ४७ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६८ लाख पेन्शनर्सला त्याचा फायदा होईल. डीएमधील वाढ १ जुलै २०२३ पासून प्रभावी असेल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यातील वेतनात जुलै आणि ऑक्टोबरमधील थकबाकी पण मिळेल. वाढत्या महागाईत या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्राहक निर्देशांकात वाढ

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करते. महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होते. एआयसीपीआय इंडेक्समध्ये तेजी आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै २०२३ मधील महागाई भत्त्यात ३.८७ टक्के अतिरिक्त फायदा होईल. महागाई भत्ता ४५ टक्के होण्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी महागाई भत्ता वाढविण्याची विनंती करण्यात आली होती.

किती वाढेल वेतन?

महागाई भत्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ३६,००० रुपये आहे, तर त्याचा डीए १५१२० रुपयांच्या जवळपास असेल. त्यात ४ टक्के वाढ झाल्यास डीए १६५६० रुपये होईल. म्हणजे प्रत्येक महिन्यात १४४० रुपयांची वाढ होईल. पूर्ण वर्षांचा विचार करता डीएच्या रुपाने १७२८० रुपयांची वाढ होईल.

अशी आहे हमीभावातील वाढ

दुसरीकडे शेतकऱ्यांना दिलासा देतांना सरकारने सहा पिकांच्या हमीभावात वाढ जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बीच्या सहा पिकांना मिळणारा हमीभाव म्हणजे किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तीळ, मोहरी, मसूर, गहू, बाजरी, चणे आणि सूर्यफूलाचा समावेश आहे. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मसूरला मिळणारा किमान दर ४२५ रुपये प्रति क्विंटल वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढलेल्या किमती २०२४-२५ पासून लागू होतील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे सीएसीपीच्या शिफारशींनुसार सहा पिकांना मिळणारा हमीभाव वाढवण्यात आला आहे. तीळ आणि मोहरीच्या दरात २०० रुपयांची, मसूरच्या किमतीत ४२५ रुपयांची, गव्हाच्या दरात १५० रुपयांची, ज्वारीच्या दरात ११५ रुपयांची, चणाच्या किमतीत १०५ रुपयांची आणि सूर्यफुलाच्या दरात १५० रुपयांची वाढ करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in