कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर केंद्र सरकार सतर्क : मार्गदर्शक तत्त्वे जारी

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १८२८ झाली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर केंद्र सरकार सतर्क : मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरियंट जे.एन.१ जगभर पसरत असताना भारतात या विषाणूने पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यात सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणीमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट जे.एन.१ ने भारतात प्रवेश केल्याचे मान्य करण्यात आले आहे. यामुळे सर्व राज्यांना पूर्णपणे अलर्टवर राहावे लागणार आहे. नवीन वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी लागतील. कोरोना प्रकरणांतील आरटी पीसीआरचा वापर करून टेस्टिंग वाढवावे लागेल. सर्व प्रकारच्या तापांचे नियमितपणे मॉनिटरिंग करावे लागेल. तसेच, एखाद्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास, त्याचे नमुनेही जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात यावेत, असे म्हटले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने ५ जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १८२८ झाली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. मृतांमध्ये ४ जण केरळ, तर १ उत्तर प्रदेशातील आहे. तसेच, देशातील मृत्युदर १.१९ टक्के आहे. यापूर्वी रविवारी देशात कोरोनाचे ३३५ नवे रुग्ण आढळले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in