केदारनाथ रोपवे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी; ९ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उत्तराखंडमधील केदारनाथ धामसाठी रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
केदारनाथ रोपवे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी; ९ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत
Published on

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उत्तराखंडमधील केदारनाथ धामसाठी रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सोनप्रयाग ते केदारनाथ असा १२.९ कि.मी.चा रोपवे बांधण्यात येणार असून, त्यासाठी ४०८१ कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे नऊ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांवर येणार आहे.

‘नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट’कडे हा रोपवे बांधण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या रोपवेमुळे केदारनाथचे अंतर फक्त ३६ मिनिटांवर येईल. सध्या पायी जाण्यासाठी ८-९ तासांचा वेळ लागतो. रोपवेद्वारे एकाचवेळी ३६भाविक बसून केदारनाथ धामला पोहचू शकतील.

चारधाम यात्रेला चालना

केंद्र सरकारने हे पाऊल चारधाम यात्रेला चालना देण्यासाठी उचलले आहे. यामुळे स्थानिक व्यवसायांनाही फायदा होईल आणि क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. यामुळे सहा महिने भाविकांची ये-जा सुरू असेल. शिवाय, प्रशासनावरील दबावही कमी होणार आहे. केदारनाथ रोपवे प्रकल्प ‘उत्तराखंड रोपवे कायदा, २०१४’अंतर्गत काम करणार असून दुसरा प्रकल्प हेमकुंड साहिबमध्ये रोपवे प्रकल्प बांधण्याचा आहे, ज्यासाठी २७३० कोटी रुपये खर्च केले जातील. या प्रकल्पाद्वारे हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे अंतर काही मिनिटांवर येईल.

logo
marathi.freepressjournal.in