तांदूळ साठेबाजांना केंद्राचा लगाम

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे तांदूळ महाग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी देशभरातील व्यापारी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, प्रक्रिया उद्योग आणि तांदूळ गिरण्यांना तांदूळ व धान्याच्या साठ्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक केले आहे.
तांदूळ साठेबाजांना केंद्राचा लगाम
तांदूळ साठेबाजांना केंद्राचा लगाम संग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे तांदूळ महाग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी देशभरातील व्यापारी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, प्रक्रिया उद्योग आणि तांदूळ गिरण्यांना तांदूळ व धान्याच्या साठ्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक केले आहे. तसेच साठेबाजी रोखण्यासाठी दक्षिणेकडील पाच राज्यांना तांदूळ आणि धानाच्या साठ्यावर मर्यादा घालण्याची मुभा दिली आहे.

केंद्राने ६ नोव्हेंबरला जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या रिटेल साखळ्या, प्रक्रिया उद्योग आणि तांदूळ गिरण्यांना सहा प्रकारांतील साठ्यांची माहिती जाहीर करावी लागणार आहे. त्यात बासमती तांदूळ, प्रीमियम, बिगर-बासमती तांदूळ, उकडा तांदूळ, तुकडा तांदूळ आणि धान यांचा समावेश आहे.

दक्षिणेच्या पाच राज्यांना साठा निर्बंधास मुभा

केंद्राने स्वतंत्र पत्राद्वारे आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांना नियंत्रण आदेशांद्वारे धान आणि तांदळाच्या साठ्यावर मर्यादा घालण्यास परवानगी दिली आहे. हे निर्बंध ३१ जानेवारी २०२७ पर्यंत लागू राहतील. तांदळाच्या पुरेशा उपलब्धतेची खातरजमा करण्याबरोबरच साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे या आदेशांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील.

तांदळाचे चढते भाव...

सप्टेंबरमध्ये किरकोळ तांदूळ महागाईचा दर वार्षिक तुलनेत ८.२५ टक्क्यांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये हा दर ५.८९ टक्के होता. तांदळाचा सरासरी किरकोळ दर प्रतिकिलो सुमारे ४८.२३ रुपये झाला असून, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत तो सुमारे १२ टक्क्यांनी अधिक आहे. दक्षिण भारतातील प्रीमियम तांदळाच्या जातींच्या दरात तुलनेने मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सोना मसुरी तांदळाचा दर प्रतिकिलो ६५ ते ७० रुपयांवर पोहोचला आहे. महिनाभरापूर्वी हा दर ५० रुपये होता.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)