उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे केंद्र सरकार सावध; राज्यांना पत्र लिहून केले सतर्क

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले असून आरोग्य विभागाने यासंदर्भात राज्यांना पत्र लिहून सतर्क केले आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे केंद्र सरकार सावध; राज्यांना पत्र लिहून केले सतर्क
Published on

नवी दिल्ली : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले असून आरोग्य विभागाने यासंदर्भात राज्यांना पत्र लिहून सतर्क केले आहे. वाढत्या तापमानामुळे लोक उष्माघाताला बळी पडू शकतात. त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना रोखण्यासाठी आरोग्य सुविधांची प्रभावी तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मार्गदर्शक कागदपत्रे सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

देशभरात एकीकडे वाढता उष्मा चिंतेचे कारण ठरत आहे. हवामान विभागाने यंदाचा उन्हाळा अधिक असेल, असा अलर्ट दिल्यानंतर देशभर तीव्र उष्णतेचे इशारे देण्यात येत आहेत. आता देशासह राज्यभरात तापमान झपाट्याने वाढू लागले हवामान विभागाच्या अहवालानुसार, मार्च २०२५ मध्ये देशातील बहुतांश भागांत तापमान सामान्यपेक्षा अधिक राहिले आहे. मार्च ते मे २०२५ या कालावधीत, ईशान्य भारत, सुदूर उत्तर भारत आणि दक्षिण-पश्चिम भाग वगळता, देशातील बहुतेक ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. मध्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील काही भागांमध्येही तापमानाचा ताण अधिक जाणवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पुढील तीन-चार दिवस उष्णतेची लाट

हवामान विभागाने पुढील ३-४ दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर आरोग्य विभागाने 'हिट-हेल्थ ॲक्शन प्लान' प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने इतर आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने उपाययोजना कराव्यात, तसेच उष्णतेच्या परिणामांचे व्यवस्थापन आणि आकलन करण्यावर भर द्यावा, असेही केंद्र सरकारने पत्राद्वारे सुचवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in