नवी दिल्ली : गुगलच्या जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पूर्वग्रहदूषित माहिती देण्यात आल्याने केंद्र सरकार गुगलला नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणात गुगलकडून माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी दिली.
एका पत्रकाराने गुगलच्या जेमिनी (पूर्वीचे नाव बार्ड) या एआय टूलला 'मोदी फॅसिस्ट आहेत का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर गुगलच्या जेमिनी टूलने असे उत्तर दिले की, 'काही तज्ज्ञांच्या मते फॅसिस्ट असलेली धोरणे राबवण्याचा मोदींवर आरोप करण्यात आला आहे. भाजपची हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी, त्यांनी विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांवर केलेली दडपशाही आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध केलेला हिंसेचा वापर यावर ते आरोप आधारित आहेत.’ याउलट अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याबद्दल असेच प्रश्न विचारले असता गुगलच्या जेमिनीने थेट उत्तर देण्याचे टाळले. संबंधित पत्रकाराने जेमिनीने दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवरून शेअर केला. त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जेमिनी टूलची ही कृती म्हणजे माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या ३ (१) (ब) या नियमाचे उल्लंघन आहे. त्यासाठी गुगलला लवकरच नोटीस बजावण्यात येणार असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.