२९ रुपये किलोने केंद्र तांदूळ विकणार, विक्री पुढील आठवड्यापासून

केंद्र सरकारने महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला ‘भारत तांदूळ’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
२९ रुपये किलोने केंद्र तांदूळ विकणार, विक्री पुढील आठवड्यापासून

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला ‘भारत तांदूळ’ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तांदूळ जनतेला २९ रुपये प्रति किलोने मिळणार आहे. या तांदळाची विक्री पुढील आठवड्यापासून केली जाणार आहे. तसेच सर्व व्यापाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या साठ्याची माहिती द्यावी. त्यामुळे दरांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, गेल्या वर्षभरात तांदळाच्या किमती १५ टक्क्याने वाढल्या आहेत. तांदळावर निर्यातबंदी करूनही सतत तांदळाचे दर वाढत आहेत. त्यामुळे तांदळाच्या दरावर नियंत्रण ठेवायला भारत तांदूळ आणण्याचा निर्णय घेतला. ‘भारत तांदळा’ची नाफेड व एनसीसीएफमार्फत बाजारात २९ रुपये दराने विक्री केली जाईल. तसेच हा तांदूळ केंद्रीय भंडारच्या किरकोळ साखळीतून विकले जाईल. ‘ई-कॉमर्स’ व्यासपीठावरून हा तांदूळ विकला जाणार आहे. हा तांदूळ ५ व १० किलो पॅकिंगमध्ये जनतेला मिळेल. ५ लाख टन तांदूळ सरकारने किरकोळ बाजारात विक्रीला उपलब्ध केला आहे. तसेच महागाईवर नियंत्रण मिळवेपर्यंत निर्यातबंदीचा निर्णय घेतला जाणार नाही, असे चोप्रा म्हणाले.

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने भारत आटा व भारत डाळ यापूर्वीच बाजारात उतरवली आहे. भारत आटा २७.५० रुपये प्रति किलो व भारत डाळ ६० रुपये प्रति किलो विकली जात आहे.अन्न सचिवाने सांगितले की, दर शुक्रवारी किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना तांदळाच्या साठ्याची माहिती पोर्टलवर सांगावी लागेल. आम्हाला तांदळाच्या दरांमध्ये कपात करायची आहे. तांदूळ सोडून सर्व खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in