
नवी दिल्ली : गैरप्रकारांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडेलेली ‘नीट-यूजी २०२४’ परीक्षा रद्द करण्याची आग्रही मागणी केली जात असतानाच केंद्र आणि ‘एनटीए’ने त्याला जोरदार विरोध केला आहे. ही परीक्षा रद्द केल्यास उद्दिष्टप्राप्तीत अडथळे निर्माण होतील आणि मोठ्या प्रमाणावर गोपनीयतेचा भंग झाल्याचे पुरावे नसतानाही लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडेल, असे केंद्र आणि ‘एनटीए’ने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ‘एनटीए’ने परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना विरोध करताना स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. सीबीआयने विविध राज्यांमध्ये याबाबत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास आपल्या हाती घेतला आहे. गोपनीयतेचा मोठ्या प्रमाणावर भंग झाल्याचे पुरावे नसताना संपूर्ण परीक्षा रद्द करणे तार्किक नाही, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. ‘एनटीए’नेही सर्वसाधारणपणे केंद्राच्याच मुद्द्यांचा प्रतिज्ञापत्रामध्ये समावेश केला आहे.
‘नीट-पीजी’ परीक्षा ११ ऑगस्टला
‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्स’ने (एनबीईएमएस) शुक्रवारी ‘नीट-पीजी’ परीक्षेसाठी नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही परीक्षा आता ११ ऑगस्टला दोन सत्रात होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा २२ जूनला घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून ही परीक्षा केवळ १२ तास आधी पुढे ढकलण्यात आली होती.