केंद्रीय तपास यंत्रणांचे देशातील ४२ ठिकाणी छापे;बिहारमध्ये ‘सीबीआय’च्या धाडी

सीबीआयने गुरुग्राममधील एका मॉलमध्येही छापा टाकला असून तो तेजस्वी यादव यांच्या मालकीचा असल्याचे समजते.
केंद्रीय तपास यंत्रणांचे देशातील ४२ ठिकाणी छापे;बिहारमध्ये ‘सीबीआय’च्या धाडी
Published on

केंद्रीय तपास यंत्रणांनी बुधवारी देशातील ४२ ठिकाणी छापे टाकले. सीबीआयच्या पथकांनी बिहारमध्ये राजदच्या सहा नेत्यांच्या घरांसह २५ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दोन राज्यसभा खासदारांव्यतिरिक्त माजी आमदार आणि राजदचे फायनान्सर अबू दोजाना यांचा समावेश आहे. सीबीआयने गुरुग्राममधील एका मॉलमध्येही छापा टाकला असून तो तेजस्वी यादव यांच्या मालकीचा असल्याचे समजते.

या धाडी रेल्वेमध्ये जमिनीच्या बदल्यात झालेल्या रोजगार घोटाळ्याशी संबंधित आहेत. राजदचे खजिनदार आणि आमदार सुनील सिंह, राज्यसभा खासदार फयाज अहमद आणि राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या घरीदेखील सीबीआयच्या पथकाने धाड टाकली. दुसरीकडे, खाण घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने कारवाई केली आहे. झारखंडमधील रांची, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये १७ ठिकाणी ‘ईडी’ने छापे टाकले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळचे असलेले प्रेम प्रकाश यांच्या रांची येथील जुन्या कार्यालयावर ‘ईडी’कडून छापा टाकण्यात आला.

प्रेम प्रकाश यांचा झारखंडच्या राजकारणात दबदबा असल्याचे मानले जाते. काही दिवसांपूर्वी ‘ईडी’ने त्यांची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. ‘ईडी’ने अनेक डीएमओ आणि मुख्यमंत्र्यांचे प्रेस सल्लागार आणि काही आमदारांच्या प्रतिनिधींचीही चौकशी केली आहे.

प्रेम प्रकाश यांच्या घरातील तिजोरीतून दोन एके-४७ जप्त

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांच्या घरातील तिजोरीतून दोन एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच ६० काडतुसेही सापडली आहेत. दरम्यान, अर्गोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार यांनी दावा केला की, जप्त केलेली दोन एके-४७ आणि ६० काडतुसे दोन्ही जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांची आहेत. जवानांवर जी काही विभागीय कारवाई होईल, ती वरिष्ठ अधिकारी करतील.

logo
marathi.freepressjournal.in