बांगलादेशला पाठवलेल्या गर्भवती महिलेला व तिच्या मुलाला परत आणू; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन

बांगलादेशला पाठवण्यात आलेली महिला सोनाली खातून आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा साबीर याला मानवतेच्या आधारावर भारतात परत आणले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिले.
Supreem Court
Supreem Court
Published on

नवी दिल्ली : बांगलादेशला पाठवण्यात आलेली महिला सोनाली खातून आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा साबीर याला मानवतेच्या आधारावर भारतात परत आणले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिले.

महाधिवक्ते तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठासमोर सांगितले की, केंद्राने सोनालीला परत आणण्याची तयारी दर्शवली आहे.केवळ मानवतावादी कारणास्तव, भारत सरकार सोनाली खातून या महिलेला तिच्या आठ वर्षांच्या मुलासह (साबीर) भारतात परत आणण्यास तयार आहे, असे मेहता यांनी म्हटले आहे.

सोनालीला दिल्लीला आणणार

दरम्यान, तुषार मेहता यांनी स्पष्ट केले की, सोनाली हिला दिल्लीत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे तिला दिल्लीला आणलं जाईल. दरम्यान, प्रतिवादींची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी सुचवले की, तिला तिचे वडील जेथे राहतात तेथे बीरभूम जिल्ह्यातील तिच्या शहरात पाठवणे योग्य ठरेल.

दुसऱ्या बाजूला, न्यायालयाने मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोनालीला सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व सुविधांचा खर्च राज्य सरकार करेल. सोनालीचं आठ वर्षांचं मूलही तिच्याबरोबर असल्याने या मुलाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

सोनालीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांचे कुटुंब २० वर्षांहून अधिक काळ दिल्लीच्या रोहिणी सेक्टर २६ मध्ये रोजंदारी कामगार म्हणून काम करत आहे. त्यांनी आरोप केला आहे की, १८ जून रोजी पोलिसांनी बांगलादेशी स्थलांतरित असल्याच्या संशयावरून कुटुंबातील अनेक सदस्यांना ताब्यात घेतले आणि नऊ दिवसांनंतर २७ जून रोजी त्यांना सीमेपलीकडे पाठवले. पोलिसांच्या या अन्यायकारक कारवाईमुळे आमचे कुटुंब विभागले गेले आहे, आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.

logo
marathi.freepressjournal.in