२५ जून आता ‘संविधान हत्या दिन’; केंद्र सरकारची घोषणा, इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये या दिवशी केली होती आणीबाणी लागू

देशात यापुढे दरवर्षी २५ जून हा ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

नवी दिल्ली : देशात यापुढे दरवर्षी २५ जून हा ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे केली. काँग्रेसच्या हुकूमशाही मानसिकतेविरुद्ध ज्यांनी लढा दिला त्यांच्या त्यागाचे आणि हौतात्म्याचे त्यामुळे जनतेला स्मरण होईल, अशी प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली, तो देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

काँग्रेसच्या या हुकूमशाही मानसिकतेविरुद्ध ज्यांनी लढा दिला, घटनेच्या रक्षणासाठी आणि लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी ज्यांनी त्याग करून हौतात्म्य पत्करले, त्याचे हा दिवस आपल्याला स्मरण करून देईल, असेही नड्डा यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. दरवर्षी हा दिवस आपल्याला लोकशाहीच्या महत्त्वाचे स्मरण करून देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

८ नोव्हेंबर ‘आजीविका हत्या दिन’, तर ४ जून ‘मोदी मुक्ती दिन’ पाळणार - काँग्रेस

केंद्र सरकारने २५ जून हा ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्याचे जाहीर केल्यानंतर त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. ढोंगीपणाने आकर्षक मथळे मिळविण्याचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘नोटबंदी’ जाहीर करण्यात आली. त्यामुळे जनता देशात यापुढे तो दिवस ‘आजीविका हत्या दिन’ म्हणून साजरा करील आणि त्याची राजपत्र अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तो दिवस इतिहासात ‘मोदी मुक्ती दिन’ म्हणून ओळखला जाईल, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.

मोदींच्या काळात सर्वात जास्त आणीबाणी - ममता

सर्वात जास्त आणीबाणी ही मोदींच्या काळात आहे. मोदींनी कोणाशीही चर्चा न करता ३ गुन्हेगारी कायदे लागू केले. अशा प्रकारचे अनेक घातक निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. त्यामुळे मोदींच्या काळात आणीबाणीसारखीच परिस्थिती आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी यादरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ममता या शरद पवार यांचीसुद्धा भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in