

नवी दिल्ली : ‘नीट-यूजी २०२६’ची फेरपरीक्षा पार पडेपर्यंत केंद्र सरकारने ‘टेलिग्राम’ या मेसेजिंग ॲपवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. परीक्षेत होणारे गैरप्रकार, फसवणूक करणाऱ्या टोळ्या आणि अफवांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) म्हटले आहे.
‘एनटीए’च्या शिफारशीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००’च्या कलम ६९ए अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, २२ जून २०२६ पर्यंत भारतामध्ये ‘टेलिग्राम’च्या वापरावर तात्पुरते निर्बंध असतील. २१ जून रोजी होणारी नीट फेरपरीक्षा आणि त्यानंतरचा काळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘फीचर’ ३० जूनपर्यंत बंद
एका वेगळ्या निर्देशानुसार, टेलिग्रामला ३० जूनपर्यंत भारतातील ‘मेसेज एडिटिंग’ हे फीचर बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. परीक्षेच्या आधीच पेपर लीक झाल्याचा खोटा पुरावा तयार करण्यासाठी या फीचरचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
संघटित टोळ्यांकडून गैरवापर
२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या ‘नीट-यूजी’ फेरपरीक्षेतील उमेदवारांची फसवणूक करण्यासाठी काही संघटित टोळ्या या प्लॅटफॉर्मचा वापर करत होत्या. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे दोन्ही निर्णय घेण्यात आले आहेत. ३ मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेश परीक्षा अनियमिततेच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली होती, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. आता ही फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार आहे.
राज्यांची मोठी कारवाई
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर'ने या कारवाईत मुख्य समन्वयकाची भूमिका बजावली आहे. बिहार, गुजरात आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने बनावट दावे करणाऱ्या अनेक टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्सवर बंदी घालण्यात आली आहे. ‘एनटीए’ने दिलेल्या माहितीनुसार, "पेपर नीट लीक्ड", "री-नीट २०२६, "प्रायव्हेट माफिया" अशा नावांनी चालणाऱ्या चॅनेल्सवर विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून पेपर देण्याच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपये उकळले जात होते.
मेसेज एडिट करून घोटाळा
टेलिग्रामवरील मेसेज एडिटिंग फीचरचा वापर करून चॅनेल ॲडमिन जुन्या मेसेजमधील पीडीएफ बदलून त्या जागी मूळ प्रश्नपत्रिका अपलोड करायचे, परंतु त्या मेसेजची जुनी वेळ तशीच राहायची. परीक्षा संपल्यानंतर जुना मेसेज एडिट करून "बघा आमच्याकडे पेपर आधीच आला होता" असा खोटा दावा करत स्क्रीनशॉट व्हायरल केले जायचे. सरकारच्या या निर्णयामुळे आता हा गैरप्रकार थांबणार आहे.
गुजरातमध्ये घोटाळा उघडकीस
याप्रकरणी गुजरातच्या अहमदाबाद सायबर क्राईम ब्रँचने एका आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे, जे ८ टेलिग्राम चॅनेल्स चालवून फसवणूक करत होते. त्यांनी तब्बल १.५ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचे समोर आले आहे. लाखो लोक वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी टेलिग्राम वापरतात. या निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ‘एनटीए’ने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, हे निर्बंध फक्त २२ जूनपर्यंतच राहतील आणि मेसेज एडिटिंग बंद असल्या तरी नवीन मेसेज पाठवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.