पोर्ट ब्लेअर नव्हे आता ‘श्री विजयपुरम’! केंद्राने अजून एका शहराचे नाव बदलले
@IndianTechGuide

पोर्ट ब्लेअर नव्हे आता ‘श्री विजयपुरम’! केंद्राने अजून एका शहराचे नाव बदलले

केंद्र सरकारने अंदमान-निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपुरम’ असे त्याचे नामकरण केले आहे.
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अंदमान-निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपुरम’ असे त्याचे नामकरण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी त्याबाबतची घोषणा ‘एक्स’ या समाज माध्यमावरून केली. ‘श्री विजयपुरम’ हे नाव स्वातंत्र्यलढा आणि त्यातील अंदमान-निकोबारचे योगदान दर्शवित राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रकारच्या प्रतीकांमधून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन गृह मंत्रालयाने शुक्रवारी पोर्ट ब्लेअरचे नामकरण 'श्री विजयपुरम' असे करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाला वेगळेच महत्त्व आहे. चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावर भारताचा तिरंगा फडकवला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेला गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचा मोठा लढा इथेही उभारला होता. हे बेट त्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

इंग्रजांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना, वास्तूंना दिलेली नावे मोदी सरकार बदलत आहे. केंद्राने आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यात आता पोर्ट ब्लेअरचे नाव समाविष्ट झाले आहे. ईस्ट इंडिया कंपनीने आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या सन्मानार्थ या बेटाचे नाव ‘पोर्ट ब्लेअर’ असे ठेवले होते, ते आता मोदी सरकारने बदलले आहे.

logo
marathi.freepressjournal.in