
जोधपूर : ‘ऑपरेशन सिंदूर’प्रकरणी विरोधकांकडून संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली जात आहे. या मागणीला बगल देण्याचे प्रयत्न सरकारच्या गोटातून सुरू असल्याचे दिसून येत आहे. ‘सरकारला कोणतीही बाब लपवायची नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांना प्रश्न विचारायची पूर्ण संधी दिली जाईल’, असे केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी विरोधकांच्या मागणीवर बोलताना सांगितले.
खासदारांसाठी भारतीय संसदेची निर्धारित कार्यपद्धती आहे. त्यात लोकसभा व राज्यसभेत त्यांना प्रश्न उपस्थित करून उत्तरे मागवता येतात. येत्या २० ते २५ दिवसांत पावसाळी अधिवेशन सुरू होईल. त्या अधिवेशनात प्रत्येकाला योग्य ती संधी देण्यात येईल, असे शेखावत यांनी सांगितले.
कोणताही गोंधळ किंवा चिंता दूर करण्याची सरकारची इच्छा आहे. आम्हाला कोणतीही बाब दडवून ठेवायची नाही. पंतप्रधानांकडून विरोधकांना नेमके काय ऐकायचे आहे, हे त्यांनी ठरवावे. त्यांना उत्तरे हवी असल्यास गेल्या तीन दिवसांत पंतप्रधानांनी वेगवेगळ्या ठिकाणी याबाबत तपशील दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत शेखावत म्हणाले की, भारताच्या शौर्यावर जागतिक समूहातील देश थक्क झाले आहेत. या मोहिमेत भारताची शक्ती दिसली आहे, असे त्यांनी सांगितले.