केंद्राची ३ लाख टन कांदा खरेदी - भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मदतीने प्रक्रिया

अतिवृष्टी यामुळे यंदा बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचे भाव नेहमीपेक्षा अनेक पटींनी वाढले आहेत
केंद्राची ३ लाख टन कांदा खरेदी - भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मदतीने प्रक्रिया

नवी दिल्ली : सध्या देशभरात टोमॅटोच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, बाजारात कांद्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा म्हणून केंद्र सरकारने विशेष दक्षता बाळगली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के अधिक, म्हणजे ३ लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. तसेच कांदा खराब न होता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) मदतीने त्यावर किरणोत्साराची प्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी रविवारी दिली.

मार्च ते मे महिन्यात वाढलेले तापमान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि आता देशाच्या अनेक भागांत सुरू असलेली अतिवृष्टी यामुळे यंदा बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचे भाव नेहमीपेक्षा अनेक पटींनी वाढले आहेत. तशी परिस्थिती कांद्याच्या बाबतीत उद‌्भवू नये म्हणून केंद्र सरकारने यंदा बफर स्टॉकसाठी गतवर्षीपेक्षा २० टक्के अधिक कांदा खरेदी केला आहे. सन २०२२ च्या रबी हंगामात केंद्र सरकराने पारइस स्टॅबिलायझेशन फंडच्या (पीएसएफ) अंतर्गत २.५१ लाख टन कांदा खरेदी करून त्याचा बफर म्हणून साठा केला होता. हा कांदा सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान विविध बाजारपेठांत पुरवण्यात आला. यंदा अधिक खबरदारी घेत केंद्राने ३ लाख टन कांदा खरेदी केला आहे. गतवर्षीपेक्षा हे प्रमाण २० टक्क्यांनी अधिक आहे. पावसाळी हवामानात कांदा खराब होऊ नये यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) मदतीने त्यावर किरणोत्साराची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

प्रक्रियेसाठी पथदर्शी प्रकल्प

साठवणूक केलेला कांदा खराब होऊ नये यासाठी केंद्र सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) यांच्या संयुक्त विद्यमाने कांद्यावर किरणोत्सार प्रक्रिया करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील लासलगाव येथे सुरुवातीला १५० टन कांद्यावर कोबाल्ट-६० द्रव्याद्वारे गॅमा किरणांची प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे कांदा खराब न होता दीर्घकाळ साठवून ठेवता येईल.

logo
marathi.freepressjournal.in