
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सेवा असलेली जेट एअरवेज नवीन व्यवस्थापनाखाली पुन्हा भरारी घेण्यास सज्ज झाली आहे. जेट एअरवेजला भारतीय विमान वाहतूक नियंत्रकांनी (डीजीसीए) वाहतूक सेवेचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे कंपनीला व्यावसायिक तत्त्वावर विमान वाहतूक करता येणार आहे.
डीजीसीएचे अध्यक्ष अरुण कुमार म्हणाले की, तीन वर्षांनंतर कंपनीला विमान वाहतुकीचा परवाना मिळाला आहे. कंपनीने १५ व १७ मे रोजी विमानांचे चाचणी उड्डाण करून दाखवले.
दरम्यान, जुलै ते सप्टेंबर दरम्यान नवीन कंपनी सेवा सुरू करणार आहे. सध्या कंपनीचे व्यवस्थापन जालान-कालरॉक महासंघाकडे आहे.
जेट एअरवेजने सांगितले की, कंपनीला डीजीसीएकडून परवानगी मिळाली आहे. जालान-कालरॉक महासंघाने सर्व अटी व नियम यांची पूर्तता केली आहे. विमाने, विमानांचा ताफा, नेटवर्क, उत्पादने, लॉयल्टी प्रोग्राम आदींची माहिती टप्प्याटप्प्याने दिली जाईल.
जालान-कालरॉकचे प्रमुख सदस्य मुरारीलाल जालान म्हणाले की, आजचा दिवस हा जेट एअरवेजसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय हवाई क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे.